लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने कचरा डेपोवर महिलांसाठी हळदी-कुंकू

लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने नगरपरिषदेच्या वरसोली कचाराडेपोवर महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिलांमध्ये स्वच्छते बाबत आणि त्यातही विशेषतः कचरा वर्गीकरण बाबत जागृती निर्माण व्हावी आणि त्यांना कचारा डेपोवर प्रत्यक्षात कशा प्रकारे कामकाज चालते याची माहिती व्हावी, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मागील वर्षी 2018 च्या सर्वेक्षणमध्ये लोणावळा नगरपरिषदेने संपूर्ण देशातून सातवा क्रमांक प्राप्त केला होता. यंदा 2019 च्या सर्वेक्षणात लोणावळा नगरपरिषदेचा क्रमांक किमान पहिल्या तीन मध्ये राहावा यासाठी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक, नगरसेविकांसह मुख्याधिकारी सचिन पवार आणि नगरपरिषदेचा सर्वच कर्मचारी वर्ग मोठी मेहनत घेत आहेत.

स्वच्छ सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून लोणावळा नगरपरिषदेच्या कचरा डेपोचा मागील वर्षभरात संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे. लोणावळा शहर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील कचरा या डेपोवर येत असतो. त्यामुळे एक काळ ज्या डेपोपासून काही किलोमीटर अंतरावरून जात असतानाही नाकाला रूमाल लावावा लागत असे, त्याचा डेपोवर हळदी-कुंकू सारखा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. हा जो बदल झाला आहे, तो नागरिकांना पाहता यावा आणि विशेषतः कचऱ्याच्या वर्गीकरणाचा फायदा कसा होतो, हे महिला वर्गाच्या लक्षात यावा या उद्देशाने मंगळवारी रथसप्तमीच्या मुहूर्तावर हा हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे नगराध्यक्षा जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी नगरसेविका सुवर्णा अकोलकर, संध्या खंडेलवाल, मंदा सोनवणे, गौरी मावकर, आरोही तळेगावकर, पूजा गायकवाड, ब्रिंदा गणात्रा, नगरसेवक देविदास कडू, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)