लोणंदमधील रस्त्याची चाळण

तात्काळ दुरुस्ती न झाल्यास साथ प्रतिष्ठान आंदोलन छेडणार
लोणंद- लोणंद येथील रस्त्यांची गेल्या काही दिवसांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे किरकोळ अपघाताच्याही घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लोणंद येथील साथ प्रतिष्ठानच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे.

लोणंद शहरातून जाणाऱ्या पुणे – सातारा रस्त्याची खड्ड्यामूळे अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुचाकीस्वारांना कसरत करत वाहन चालवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. तसेच चारचाकी वाहन धारकांबरोबर नागरिकांचे ही हाल होऊ लागले आहेत. छोट्यामोठ्या अपघाताची शक्‍यता व यातून आर्थिक, जिवीत हानी होऊ शकते. मात्र, अशी गंभीर समस्या असूनही ती निवारण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करीत असल्याने दिसत आहे. अशा झोपेचे सोंग घेतलेल्या विभागाला जाग आणण्यासाठी साथ प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्यावतीने आंदोलनाच्या भूमिकेत या खड्डेमय रस्त्यावर उतरावे लागेल, असा गंभीर इशारा साथ प्रतिष्ठानच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी विश्रामगृह लोणंद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोणंद शाखेतील असिस्टंट इंजीनिअर नीलेश बसवे यांना देताना साथ प्रतिष्ठान अध्यक्ष कय्युमभाई मुल्ला, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, विशेष कार्यकारी अधिकारी सुनील यादव, साथ प्रतिष्ठान सचिव मंगेश माने, कार्याध्यक्ष दीपक बाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)