लोणंदची बेघरवस्ती भुईसपाट

ऐन थंडीत 250 कुटुंबे उघड्यावर : पोलिस बंदोबस्तात कारवाई

लोणंद – लोणंद येथील रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील अतिक्रमण झालेली बेघरवस्ती पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने भुईसपाट करण्यात आली. यामुळे ऐन थंडीत सुमारे अडीचशे कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.

लोणंद येथे बेघरवस्तीबाबत नोटीस दिल्यानुसार काय होणार याची तणावपूर्ण वातावरणात कुजबूज सुरू होती. शुक्रवारी सकाळपासूनच जिल्हा पोलीस दलाचा मोठा फौजफाटा परिसरात दाखल झाला होता. बघ्यांचीही अफाट गर्दी झालेली. सकाळी अकराच्या सुमारास रेल्वे कर्मचारी, रेल्वे पोलिस, जिल्हा पोलीस दल जेसीबीसह दाखल झाले. त्यांनी रहिवाशांना अर्धा तास घरातील सर्व चीजवस्तू बाहेर काढण्यासाठी वेळ दिला. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे हटविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.

लोणंद रेल्वे स्टेशनच्या बाजूला नवीन प्रस्तावित पॉवर स्टेशनसाठी रेल्वेच्या हद्दीत दक्षिणेला असलेल्या बेघर वस्तीसह आंबेडकर वसाहत, रोटरी गार्डन शेजारील झोपडपट्टी तसेच बसस्थानक आणि रेल्वे स्टेशनच्या मध्ये असलेली झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आली.

अनेक कुटुंबीयांनी नोटीस आल्याने आधीच घरातील चीजवस्तू बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे फारसा पेचप्रसंग न उद्‌भवता अतिक्रमणे हटवण्याच्या काम विनासायास पार पडले. साथ प्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते कोणाचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्नशील राहिले. विस्थापितांना खाद्यपदार्थांचे वाटप केले. आणि विस्थापितांचे पुन्हा पुनर्वसन करण्यासंदर्भात नियोजन करू लागले.

दरम्यान, ऐन थंडीत सुमारे दोनशेपेक्षा जास्त कुटुंबे अचानक उघड्यावर आल्याने त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी निवेदन देऊन व आंदोलन करुनही बेघरवस्तीला वाचवण्यात कोणत्याही पक्षाला यश आले नाही. उघड्यावर पडलेले संसार निमूटपणे पाहण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच उरले नाही. लहान मुले, वृद्ध, महिला यांना घेऊन कुठं जायचं असा मोठा प्रश्‍न त्यांच्या समोर आ वासून उभा राहिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)