मनमोहक लोड-तक्‍क्‍या

लोड-तक्‍क्‍या हे शब्द ऐकले की भारतीय बैठकीची आठवण येते. पूर्वीच्या घरात बैठकीच्या खोलीत एका भिंतीला छोटी गादी लावून ठेवलेली असायची त्यावर मागे तक्‍क्‍या आणि दोन बाजूला दोन लोड लावलेले असायचे अत्यंत आटोपशीर व खानदानी दिसणारी असी ती रचना असायची.

ग्रामीण विषयावरील चित्रपटात तर हे हमखास दिसायचे. आणि ते बहुदा गावच्या पाटलाचे किंवा जमीनदाराचे घर असणार हे प्रेक्षकांच्याही लक्षात यायचे. विवाह समारंभातील विधी भारतीय बैठकीवर होत असल्याने तिथेही दोन्ही बाजूला लोड लावलेले असायचे. पूर्वीच्या काळी शहरातल्या वाडा संस्कृतीतही वाड्याच्या ओसरीवर तक्‍क्‍या लोडासह भारतीय बैठक असायची त्यावर पानाचा डबा असायचा. आला-गेला, पै-पाहुणा तिथेच बसून आपल्या कामाविषयीचं बोलायचे. मध्यंतरीच्या काळात आपल्याकडे आधुनिकीकरण आले आणि आपल्याला खाली बसण्यापेक्षा उंचावर म्हणजे खुर्ची, सोफा, आरामखुर्ची यावर बसणे सोयीचे वाटू लागले. आपण तेच पसंत करू लागलो. त्यात प्लॅस्टिकच्या खुर्च्या, पत्र्याच्या खुर्च्या, वेताचे सोफा, स्पंजचा सोफा असे अनेक प्रकार आले. घरातल्या घरात टांगलेला छोटा एकाच माणसाला बसता येईल असा झोपाळाही आला.

पण नंतर मात्र आपल्याला या तोचतोचपणाचा कंटाळा आला. अंतर्गत सजावट करणाऱ्या व्यक्तीही नव्याच्या शोधात होत्या आणि त्यांना भारतीय बैठक पुन्हा नव्याने वापरायच्या नव्या पर्यायाचा शोध लागला. बैठकीया खोलीत पाश्‍चात्य व भारतीय अशा दोन्ही सजावटींचे मिश्रण दिसू लागले. मित्र मंडळींशी अनौपचारिक गप्पा मारताना आपोआपच लोड मांडीवर घेतला जातो, पुढ्यातले चहाचे कप अशा वातावरणात गप्पांना चढणारा रंग औरच असतो. शास्त्रीय ंगीत ऐकण्यासाठीही आपल्या अशीच बैठक हवी असते. आपल्याकडे काही ठिकाणी मोठ्या चौकोनी झोपाळ्यावरही गादी आणि दोन्ही बाजूला लोड लावून आरामात बसण्याची सोय केली जाते, गप्पांची मैफल तिथेही सजते.मराठी चित्रपटांनी मात्र कात टाकल्यामुळे ग्रामीण बाजाचे चित्रपट कमी निघू लागले आणि लोड-तक्‍क्‍यासुद्धा कमी दिसू लागले. तर ग्रामीण भागात शहरी लोण पसरल्याने त्यांना खुर्च्या वापरणे सुटसुटीत वाटू लागले. एखाद्या प्रसंगी लोड-तक्‍क्‍या आवश्‍यक वाटल्यास शहरी भागात ते भाड्याने मिळण्याची सोय होऊ लागली, आणि लोकांनाही शाही पद्धतीने समारंभ साजरा केल्याचे समाधान मिळू लागले.

डॉ. नीलम ताटके


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)