लोक संतांच्या देखील जाती पहायला लागले आहेत

अलीकडच्या काळात समाजात जातीभेद वाढला आहे. लोक संतांच्या देखील जाती पहायला लागले आहेत. राजकीय चळवळी करण्यासाठी बाहेरील लोक अशा अपप्रवृत्ती पसरवीत आहेत. जातीभेदाची ही प्रवृत्ती वारकरी संप्रदायात नाही. अशा अपप्रवृत्तींना संप्रदायातील लोकांनी बळी पडू नये. संतांची शिकवण ही महाराष्ट्राच्या सामाजिकतेला आधारभूत असे ऐक्‍य आहे. त्यामुळे हे ऐक्‍य कोणत्याही राजकीय, सामाजिक, अपप्रवृत्तींमुळे तुटणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

पुणे- श्री ज्ञानेश्वरी वाचन मंडळ ट्रस्ट व श्री समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण शताब्दी महोत्सव च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी वारकरी भजनी मालिका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ज्ञानेश्वरी वाचन मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा पानसरे, बाळासाहेब सातपुते, तुकाराम रासने, समस्त नामदेव शिंपी दैव मंडळाचे अध्यक्ष रमेश मेहेर, शाहीर हेमंत मावळे, संदीप लचके आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी नलूताई कासार यांचा सन्मान करण्यात आला.

सदानंद मोरे म्हणाले, वारकरी संप्रदाय हा ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या आधी पासून चालत आलेला संप्रदाय आहे. या संप्रदायाचे आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल आणि त्याची उपासना म्हणजे वारी. कोणत्याही संप्रदायात दैवत आणि दैवताची उपासना या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. संप्रदायाला एक प्रतिष्ठेची ओळख तेव्हा मिळते जेव्हा त्यांच्याकडे स्वत:चा ग्रंथ असतो आणि वारकरी संप्रदायाची ओळख म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)