जयपूर: कोणतीही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला, मुलाखत देणाऱ्या उमेदवाराला मोठ्या अपेक्षा असतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता परीक्षा, मुलाखत देणारे तसे कमीच. मात्र आता राजस्थान लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्यांना ‘कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेऊ नका,’ हे व्यवस्थित लक्षात ठेवावे लागणार आहे. कारण लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भगवदगीतेमधील प्रश्न विचारले जाणार आहेत.

राजस्थान लोकसेवा आयोगाने (आरपीएससी) 2018 च्या प्रशासकीय परीक्षेच्या अभ्यासक्रमात थोडा बदल केला आहे. त्यामुळे सामान्य ज्ञानाला नितीशास्त्राची जोड देण्यात आली आहे. यामध्ये भगवद्गीता आणि महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे. बदललेल्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय नेते, समाज सुधारक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जीवनाबद्दलच्या माहितीचाही समावेश आहे.

राजस्थान प्रशासकीय सेवेच्या 2018 च्या बदलेल्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या पेपरमध्ये सामान्य ज्ञानाबद्दलचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. याशिवाय प्रशासन आणि व्यवस्थापनात भगवद्गीतेची भूमिका यासंदर्भातील प्रश्नदेखील विचारले जातील. या पेपरमध्ये एकूण 3 युनिट असतील. भगवद्गीतेमध्ये कुरुक्षेत्रावरील लढाईच्या दरम्यान भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात झालेल्या संवादाचे 18 अध्याय आहेत. यामधूनच परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना प्रशासकीय आणि व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी भगवद्गीतेमधील प्रश्न विचारण्यात येणार असल्याचे राजस्थान लोकसेवा आयोगच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ‘सर्व अध्याय लक्षात ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळू शकतात. त्यामुळे त्यांना अधिकारी झाल्यावर प्रशासकीय निर्णय घेताना मदत होईल,’ अशी माहितीदेखील या अधिकाऱ्याने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)