दोन हजारांची लाच स्वीकारताना मंडलाधिकारी जाळ्यात

सातारा,दि.16 (प्रतिनिधी)
जमिनीच्या नोंदी तक्रारदारांच्या नावाने करण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारणाऱ्या मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कृष्णा तुकाराम वाघमारे असे तारळे येथील पकडलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्‍यातील तारळे या गावातील तक्रारदाराला त्याच्या आईच्या नावे असलेल्या जमिनीच्या नोंदी स्वतःच्या नावे करायच्या होत्या. त्यासंदर्भात मंडलाधिकारी कार्यालयात काही तक्रारी दाखल होत्या.

दाखल तक्रारींचा निकाल देण्यासाठी व दस्तांची नोंद तक्रारदारांच्या नावे घालण्यासाठी मंडलाधिकारी वाघमारे याने दोन हजारांची लाच मागितली होती. याबाबत तारळे येथील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.

प्राप्त तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला, सहाय्यक फौजदार जयंत कुलकर्णी, आनंद सपकाळ, हवालदार भरत शिंदे , संजय साळुंखे, काटवटे, अजित कर्णे, विनोद राजे, प्रशांत ताटे, संजय अडसूळ,भोसले वायदंडे येवले, काटकर, महिला पोलीस माने, सपकाळ यांनी तारळे येथे जाऊन लाचखोर मंडलाधिकारी वाघमारे याला रंगेहाथ पकडला.

त्यानंतर लाचखोर मंडलाधिकाऱ्याच्या विरोधात उंब्रज पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही लोकसेवकांकडून लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)