लोकसभेला शिवसेनेकडून घनश्‍याम शेलार

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नगर दौऱ्यात करणार घोषणा
नगर – शिवसेना व भाजपची लोकसभा निवडणुकीत युती न होण्याचे स्पष्ट संकेत मिळत असून घनश्‍याम शेलार यांची नगर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी निश्‍चित झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 21 तारखेला नगर येथे येत असून, त्याच वेळी ते शेलार यांची उमेदवारी जाहीर करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वंच पक्षांनी युद्धपातळीवर सुरू केली आहे. या मतदारसंघातून दिलीप गांधी निवडून गेले आहेत. सर्वेक्षणाचे निष्कर्ष काहीही असले, तरी उमेदवारी आपल्याच मिळेल, असे गृहीत धरून त्यांनी स्वतः च्या प्रचाराला सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी त्यांचे प्रचाररथ फिरत आहेत. भाजपकडे त्यांच्याशिवाय पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचेही नाव आहे; परंतु प्रा. शिंदे राज्याच्या राजकारणात समाधानी आहेत. भाजपचे जिल्हाप्रमुख प्रा. भानुदास बेरड यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत आहे. पक्षाने संधी दिली, तर प्रा. बेरड यांची त्यासाठी तयारी आहे. खा. गांधी यांनी मात्र लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मात्र आघाडी होण्याचे संकेत दिले आहेत, तरीही नगर लोकसभा मतदारसंघावरून दोन्ही पक्षांत चांगलीच रस्सीखेच आहे. नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास पद्मश्री विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे इच्छुक आहेत. गेल्या वर्षापासून त्यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची जुनी विकास आघाडी त्यांच्या दिमतीला आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद दक्षिणेला देण्याचा निर्णय असो, की नगर शहरात मोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा; विखे यांचा अंतस्थ हेतू लपून राहिलेला नाही. कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप पाथर्डीत करताना खा. अशोक चव्हाण, आ. बाळासाहेब थोरात यांची भाषणे नगर लोकसभा मतदारसंघ बदलून मिळण्याविषयीचा आग्रह करणारी होती. स्वतः डॉ. विखे यांनीही राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष अपयशाचा शिक्का मारताना आपण या मतदारसंघातून निवडून येऊ शकतो, असा संदेश दिला. त्याअगोदर डॉ. विखे यांनी नगरच्या एका कार्यक्रमात मुद्दाम राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सत्कार केला, त्यामागची त्यांची व्यूहनीती लपून राहिलेली नाही.
नगर लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेस आग्रही आहे, हे ओळखून तसेच राष्ट्रवादीतील काहींना ही जागा विखे यांना सोडावी, असे वाटत असल्याने राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर आपला हक्क आहे, असे सांगून आ. अरुण जगताप यांची उमेदवारी जाहीर केली. जगताप-विखे यांचे सख्य फार जुने आहे. या मतदारसंघात आकडेवारीत तरी किमान कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी वरचढ आहे. दोन आमदार, कारखाने, पंचायत समित्या आदी संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. श्रीगोंदे सहकारी साखर कारखाना, पारनेर पंचायत समितीच फक्त कॉंग्रेसकडे आहे. नगर लोकसभेसाठी कॉंग्रेसने केलेली व्यूहनीती लक्षात घेऊन राष्ट्रवादीनेही जिल्हाध्यक्षपद दक्षिणेला दिले. दोन्ही कॉंग्रेसच्या वादात ही जागा कोणत्या पक्षाला सुटते, यावर या मतदारसंघातील उमेदवार ठरणार आहे.
दोन्ही कॉंग्रेस, भाजपच्या उमेदवारांनी तयारी सुरू केली असताना ठाकरे यांनी दक्षिणेतील कार्यकर्त्यांना मुंबईत बोलवून त्यांच्यांशी नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा केली. शिवसेनेने भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागे जेव्हा भाजपच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे शिवसेनेने कथित पुस्तिकेतून चव्हाट्यावर आणून नंतर या पुस्तिकेबाबत नरो वा कुंजरो वा भूमिका घेतली, तेव्हा त्यात खा. गांधी यांच्या नगर अर्बन बॅंकेतील कारभाराचा उल्लेख होता. खा. गांधी यांनी सिगारेटमुळे कॅन्सर होत नाही, असे वादग्रस्त विधान केले होते, तेव्हाही शिवसेना त्यांच्यावर तुटून पडली होती. श्रीकांत छिंदम प्रकरणातही छिंदम कमी आणि गांधीच जास्त लक्ष्य अशी स्थिती होती. माजी आ. अनिल राठोड व खा. गांधी यांच्यातून सध्याही विस्तव जात नाही. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत झालेल्या बैठकीत शेलार यांच्या उमेदवारीवर शिवसेनेने शिक्कामोर्तब केले असून, त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेलार पूर्वी भाजपत होते. सूर्यभान वहाडणे पाटील यांच्या काळात त्यांची उमेदवारी लोकसभेसाठी जाहीर झाली होती; परंतु त्यानंतर पक्षाविरोधात उपोषणे व अन्य दबावामुळे शेलार यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. भाजप, राष्ट्रवादी व आता शिवसेना असा प्रवास झालेल्या शेलार यांना संघटनात्मक पदे मिळाली; परंतु त्यांना आतापर्यंत उमेदवारीने हुलकावणी दिली. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने शेलार यांची उमेदवारी निश्‍चित केली आहे. ठाकरे स्वतः त्याबाबतची घोषणा नगरला 21 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात करणार आहेत.

एका तालुक्‍यातील दोन उमेदवार

बरोबर 19 वर्षांपूर्वी शेलार यांची उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा श्रीगोंदे तालुक्‍यातील बाबासाहेब भोस हे लोकसभेला उमेदवार होते. एकाच तालुक्‍यातील दोन उमेदवार असतील, तर मतविभागणी होईल, असे कारण सांगून खा. गांधी गटाने शेलार यांची उमेदवारी रद्द करण्यास भाग पाडले होते. विशेष म्हणजे आताही राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदलार अरुण जगताप आणि शिवसेनेचे उमेदवार शेलार हे दोघे एकाच तालुक्‍याचे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)