लोकसभेमध्ये सलग सातव्या दिवशीही कामकाज नाही

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली: राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या मुद्दयावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेमध्ये आज सलग सातव्या दिवशी कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. प्रश्‍नोत्तराच्या तासादरम्यान केवळ 10 मिनिटांसाठी लोकसभेचे कामकाज झाले. मात्र त्यानंतर लगेचच कॉंग्रेस आणि तेलगू देसम पार्टीच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत मोकळ्या जागेमध्ये धाव घेतली.

अद्रमुकच्या सदस्यांनी सुरुवातीला जागेवर बसून घोषणा दिल्या. मात्र नंतर तेही विरोधकांसमवेत मोकळ्या जागेत एकत्र आले. राफेल विमान खरेदीची चौकशी करण्यासाठी संयुक्‍त संसदीय समिती नियुक्‍त करण्याची मागणी कॉंग्रेसचे सदस्य करत होते. तर आंध्रप्रदेशातील स्टील प्रकल्प रद्द करावा आणि आंध्राला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी टीडीपीचे सदस्य करत होते. अद्रमुकच्या सदस्यांनी कावेरी नदीवरील धरणाला विरोध केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राफेलच्या प्रकरणावरून राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असल्याने त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या सदस्यांनी करायला सुरुवात केल्यावर सभापती सुमित्रा महाजन यांनी कामकाज तहकूब केले.
राज्यसभेमध्येही राफेल आणि कावेरी नदीच्या मुद्दयावरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे कोणतेही कामकाज होऊ शकले नाही.

कॉंग्रेस सदस्यांनी राफेलबाबत फलक फडकावून संयुक्‍त संसदीय समितीची मागणी केली. त्याला सत्तारुढ भाजपकडून जोरदार विरोध झाला. सर्व विषयांवर चर्चा होईल, असे आश्‍वासन अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी दिले तरीही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिली. राफेल व्यतिरिक्त शेतीपुढील समस्या आणि भाववाढीवरही चर्चा प्रलंबित आहे, याचीही आठवण नायडू यांनी करून दिली. मात्र तरिही गदारोळ थांबला नाही, त्यामुळे कामकाज तहकूब केले गेले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राफेल खरेदीच्या मुद्दयावरून गेल्या सात दिवसात एकही दिवस कामकाज होऊ शकलेले नाही. 11 डिसेंबरला अधिवेशन सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून संसदेचे कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे तहकूब करावे लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)