लोकसभेची निवडणूक मुंबईतून लढविणार

रामदास आठवले यांची घोषणा; शिवसेना बरोबर नसली, तरी आपण भाजपसोबत

प्रभात वृत्तसेवा
नगर – शिर्डी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय आपण रद्द केला आहे. यापूर्वी आपण दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे. त्यामुळे याच भागातून आगामी लोकसभा लढविणार आहे, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक कल्याण न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. लोकसभा आणि विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युती झाली नाही, तरी आपण भाजपसोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की अंधश्रद्धांना प्रोत्साहन देणे, मनुस्मृती श्रेष्ठ म्हणून सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्या संभाजी भिडेंवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. भिडे हे समाजात द्वेष पसरविण्याचे काम करीत आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालीत आहेत. मनुस्मृतीला राज्यघटनेपेक्षा श्रेष्ठ मानत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. भिडे यांच्यापेक्षा कायदा मोठा आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करणार आहोत. ऍट्रॉसिटी कायद्यातील सुधारणेला धक्का लागणार नाही. ऍट्रॉसिटीच्या नवीन कायद्यामध्ये दलित समाजाला संरक्षण देण्याचे काम केले आहे. या कायद्यात कोणताही फेरबदल आता होणार नाही. केंद्र व राज्य शासन दलितांच्या पाठिशी आहे. ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होणार नाही, यासाठी सामाजिक न्याय मंत्रालय लक्ष ठेवणार आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक आहे. केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरील काही कर कमी केल्यास दर कमी करता येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांना दोन्ही इंधनाचा दर कमी करण्यासाठी प्रस्ताव करण्यास सांगितले आहे. लवकरच इंधनाचे दर कमी होतील, असा विश्‍वास आठवले यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा हा हिंदुत्वाचाच आहे. भाजप सत्तेवर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचा मुद्दा त्यांनी खोडून काढला. एल्गार परिषदेचा कोरेगाव भीमाच्या दंगलीशी संबंध नाही. विचारवंत पकडू नयेत. खरा आंबेडकरवादी आहे, त्याने नक्षलवादी होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. सनातनवाल्यांना सरकारने संरक्षण दिलेले नाही. त्यांना संरक्षण दिले असते, तर पोलिसांनी अटक केली नसती. भाजप सरकार सनातनवाल्यांना पाठिशी घालत नाही, असे ते म्हणाले.

अनुदानात वाढ करणार

विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा विषय गंभीर झाला आहे. सर्व घटकातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी वेळेत शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातील. स्वयंसेवी संस्थांच्या वसतिगृहातील मुलांना सध्या महिन्याला अवघे 900 रुपये अनुदान दिले जात आहे. या अनुदानात वाढ करण्याचे संकेत आठवले यांनी दिले.

दलित हा ऊर्जा देणारा शब्द

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तसेच मध्य प्रदेशातील न्यायालयाने दलित हा शब्द संविधानिक नसल्याकडे लक्ष वेधून तो वापरण्यावर विचार करण्याचे निर्देश दिले आहेत, त्याबाबत आठवले यांना छेडता ते म्हणाले, की दलित नावाचा समावेश असलेल्या हजारो संघटना देशात आहेत. दलित हा शब्द ऊर्जा देणारा आहे. या शब्दाच्या वापरास परवानगी मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या वतीने याचिका दाखल करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)