लोकसभेचा प्रशासकीय अजेंडा, राबविणार तडीपारीचा फंडा

कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने आज जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

नगर: लोकसभा निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिने अनेक उपाययोजना केल्या जात आहे. लोकसभा निवडणुकीवेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन महापालिका आणि श्रीगोंदे नगरपालिका निवडणुकीत समाजकंटकांविरोधात राबविलेला तडीपारीचा फंडा वापरणार आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने उद्या (गुरूवारी) दुपारी बारा वाजता बैठक बोलवली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक बोलावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक, नगर आणि श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, शेवगाव, कर्जत, नगर शहर व ग्रामीणचे उपविभागीय दंडाधिकारी, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, जिल्ह्यातील सर्व पोलीस उपधीक्षक, नगर व श्रीरामपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, स्थानिक पोलीस ठाण्याचे निरीक्षक, नायब तहसीलदार यांना पत्र पाठवून या बैठकीला उपस्थित राहण्याचे सूचविले आहे. ही बैठक कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असल्याने त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी उपस्थित राहाणे अनिवार्य असल्याची माहिती अरुण आनंदकर यांनी दिली आहे.

या बैठकीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने आढावा घेतला जाणार आहे. 2014 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा, हद्दपारीच्या प्रस्तावाची माहिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, मुंबई दारूबंदीच्या कारवाई, वॉरंट, संवेदनशील बूथ निश्‍चित करणे, अधिकृत आणि अनाधिकृत शस्त्रांची माहिती घेणे, वाहतूक व्यवस्था, भरारी पथकांची नियुक्ती करणे आदी मुद्यांवर या बैठकीत निर्णय घेतले जाणार आहेत.


या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात येणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीत घेण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयाच्या अंमलबजावणीवर निवडणूक आयोगाचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे कार्यवाहीत हलगर्जीपणा अधिकाऱ्यांच्या अंगलट येऊ शकतो. त्यामुळे दक्ष राहून प्रत्येक काम होणे गरजेचे आहे. जिल्हा निवडणूक शाखेचे निवडणुकीच्या दृष्टिने योग्य ती तयारी पूर्ण झाली आहे.
अरुण आनंदकर उपजिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक शाखा


5 हजार समाजकंटकांवर तडीपारी शक्‍यता

महापालिका निवडणुकीत कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिने नगर शहरातील सुमारे 750 पेक्षा जास्त आणि श्रीगोंदे नगरपालिका निवडणुकीत सुमारे 55 समाजकंटकांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिने हा प्रशाकीय फंडा यशस्वी ठरला आहे. त्याची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीत करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. लोकसभा निवडणूक काळात सुमारे 5 हजार पेक्षा जास्त समाजकंटकांवर तडीपारीच्या कारवाईचे टांगती तलावर असू शकते, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)