लोकसभा विसर्जित करून मुदतपूर्व निवडणुका घ्याच…

कॉंग्रेसचे मोदींना आव्हान
नवी दिल्ली – एकत्रित निवडणुकांबाबतच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. चालू वर्षीच्या अखेरीस चार राज्यांमधील विधानसभांची मुदत संपणार आहे. मोदींनी लोकसभा लवकर विसर्जित करावी आणि त्या राज्यांसमवेत मुदतपूर्व निवडणुका घ्याव्यात, असे कॉंग्रेसने म्हटले आहे.

महाराष्ट्रासह अकरा राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीबरोबरच घेण्याच्या प्रस्तावावर भाजप विचार करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावर कॉंग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तिसगढ आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभांची मुदत चालू वर्षी समाप्त होणार आहे. त्याचा संदर्भ देऊन कॉंग्रेस सरचिटणीस अशोक गेहलोत म्हणाले, त्या राज्यांमधील विधानसभा निवडणुका पुढे ढकलून त्या पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीबरोबर घेणे घटना आणि कायद्यानुसार शक्‍य नाही. लोकसभा विसर्जित करणे आणि लोकसभेची निवडणूक चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसमवेत घेणे हा एकमेव पर्याय आहे. तो पर्याय निवडला तर कॉंग्रेस स्वागतच करेल. आम्ही सज्ज आहोत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

-Ads-

भाजपशी राजकीय संघर्ष करून त्या पक्षाला चारीमुंड्या चीत करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. मोदी सरकार आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारांच्या अपयशावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वन नेशन, वन इलेक्‍शन ही राजकीय क्‍लृप्ती पुढे करण्यात आली आहे. त्यामागे भाजपचा साफ हेतू नाही, असा आरोपही गेहलोत यांनी केला. दरम्यान, अकरा राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीबरोबर घेण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे वृत्त भाजपने फेटाळले आहे. कायद्याला अनुसरून आणि सहमतीनेच एकत्रित निवडणुका घेण्यास आम्ही अनुकूल आहोत, अशी सारवासारव भाजपकडून करण्यात आली आहे.

अमेरिका, रशियासमवेतही निवडणुका घेतल्या जाऊ शकतात – शिवसेना
एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावरून शिवसेनेने मित्रपक्ष भाजपला शाब्दिक टोला लगावला आहे. मोदींनी ठरवलं तर ते लोकसभेसमवेत अमेरिका आणि रशियाच्याही निवडणुका घेऊ शकतात, अशी तिरकस प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. एकत्रित निवडणुका घेण्याचा लाभ देशाला कसा काय होईल, असा सवाल करून त्यांनी आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसेल, असे भाकितही केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)