लोकशाहीत नैतिक मूल्यांचा ऱ्हास चिंताजनक – डॉ. गोपाळ गुरू

कोल्हापूर – लोकशाहीत नैतिक मूल्यांचा ऱ्हास होणे ही चिंतेची बाब आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. गोपाळ गुरू यांनी आज येथे व्यक्त केले.शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही संकल्पना’ या विषयावर ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

यावेळी  बोलताना  गुरू म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत लोकशाहीत ‘एक व्यक्ती, एक मत’ याच्या बरोबरीने‘एक व्यक्ती, एक मूल्य’ या तत्त्वाला नितांत महत्त्व आहे. माणुसकी हे महत्त्वाचे मूल्य आहे.ते वृद्धिंगत होण्यासाठीचे प्रयत्न म्हणजे लोकशाही होय. मात्र, सद्यस्थितीत या मतांचे वस्तूकरण होऊन त्याचे मूल्य बाजारीकरणाच्या माध्यमातून वसूल करण्याचा प्रयत्न दिसतो, तेव्हा त्या मताचे अवमूल्यन तर होतेच, मात्र तिथे नैतिकतेचाही अधःपात, पराभव होतो.

लोकशाही हा शब्द सातत्याने वापरून आपण तो गुळगुळीत करून टाकला आहे. त्याचे निःसत्त्वीकरण केले आहे. तथापि, लोकशाहीच्या नितीमत्तेची बाजू मात्र आपण सोयीस्कररित्या विसरून जातो . फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचार व कार्यामुळे लोकशाहीच्या संकल्पनेला नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. या नैतिक अधिष्ठानाच्या बळावर समाजातील शोषित, वंचित, आदिवासी, भटके-विमुक्त आदी समाजघटकांना जेव्हा त्यांचे म्हणणे मांडण्याची, विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते, तेव्हा तिथे खऱ्या लोकशाही प्रस्थापनेची सुरवात होते. अशा प्रकारची स्वातंत्र, समता व बंधुता या मूलभूत मूल्यांवर अधिष्ठित लोकशाही बाबासाहेबांना अभिप्रेत होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)