लोकशाहीतील सुमधुर संभाषण हरपले

पिंपरी-चिंचवड वर्तमान
तुषार रंधवे

लोकशाहीचे मंदिर सुंदर
सुमधुर संभाषण घडो निरंतर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहात हे वाक्‍य सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना स्पष्टपणे दिसावे, याकरिता दर्शनी भागात लावण्यात आले आहे. प्रत्येकाने लोकशाहीचा आदर राखला पाहिजे, असे या वाक्‍यातून प्रतित होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतील शब्दप्रयोग पाहिले, तर या सुमधुर संभाषणाची “ऐशी की तैशी’ झाल्याचे दिसले. या दोन्ही जबाबदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून सुमधुर संभाषणातील सुमधुरता हरवली आहे का, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.
—–
महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करु देण्याची जबाबदारी प्रशासन प्रमुख म्हणून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची आहे. तर विरोधकांच्या व प्रशासनाच्या चुकीच्या कामांना अटकाव करुन त्याला विरोध करण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी या ना त्या कारणास्तव भाजपला खिंडीत पकडण्याची एकही संधी गमावली नाही. मात्र, बहुमताच्या जोरावर हा विरोध मोडून काढत सत्ताधारी भाजपकडून अनेक विकास कामे रेटून नेली आहेत.

दुसरीकडे प्रशासन प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कामांना रोखण्याऐवजी प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केला होता. आयुक्तांच्या या वर्तणुकीला कंटाळून कलाटे यांनी आयुक्तांना भाजपच्या घरगड्याची उपमा दिली होती. त्यामुळे आयुक्त हर्डीकर चांगलेच भडकले होते. शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी, मनसे पदाधिकाऱ्यांना देखील आयुक्तांच्या वर्तणुकीवर आक्षेप आहे. अनियमित पाणी पुरवठ्यावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मुख्यालयातील पाणी पुरवठा विभागात केलेल्या आंदोलनानंतर पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा आयुक्तांचा पक्षपातीपणा असल्याचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा समज झाला आहे.

आयुक्तांच्या भाजप पूरक भूमिकेला दत्ता साने यांचा तीव्र विरोध आहे. सत्ताधाऱ्यांच्या पुढे-पुढे करण्याऐवजी आयुक्तांनी विकास कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करत, भाजपच्या चुकीच्या कामांना विरोध करण्याची त्यांची अपेक्षा आहे. मात्र, आयुक्त त्यांची भुमिका योग्यप्रकारे बजावत नसल्याचा साने यांचा आरोप आहे. साने आणि हर्डीकर यांच्यात यापूर्वी देखील आकुर्डीत शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच “स्मार्ट सिटी’ सादरीकरणात आमदार-खासदार व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उडालेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान अगदी एकेरीवर आलेले संभाषण निश्‍चितच योग्य नाही. वास्तविकतः पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील वर्तणुकीने समाजासमोर आदर्श निर्माण करणे अपेक्षित आहे. मात्र, या घटनेची पुनरावृत्ती घडू नये, याकरिता सार्वजनिक जीवनात वावरताना खबरदारी घेणे नक्कीच योग्य ठरू शकेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)