लोकलच्या फेऱ्यांना “लॉंग ब्रेक’

पिंपरी – पुणे-लोणावळा या मार्गावर प्रवाशांची संख्या दिवसें-दिवस वाढत असताना देखील लोकलच्या फेऱ्या वाढायचे नाव घेत नाहीत. यामुळे प्रवाशांनीही याबाबत ओरड सुरु केली आहे. 11 मार्च 1978 साली पुणे-लोणावळा लोकल सुरु झाली. मात्र या 42 वर्षात केवळ 44 फेऱ्या असल्याने मात्र या मार्गावरील तिसरी रेल्वे लाईन काही सुरु झालेली नाही. एवढेच नाही तर अद्याप कोणतीही वाढीव फेरी वाढवण्यास रेल्वे प्रशासन तयार नाही.

पुणे- लोणावळा मार्गावर उपनगरीय लोकल गाडयांच्या दररोज सुमारे 44 फेऱ्या होतात. सुमारे 120 एक्‍स्प्रेस गाडया आणि 25 ते 30 मालगाडया या मार्गावरून दररोज जातात. त्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. लोहमार्गाच्या देखभालीचा दिवसातील काही वेळ वगळता इतर वेळेला अगदी मध्यरात्र ते पहाटेपर्यंतही हा मार्ग व्यस्त असतो. पुणे- लोणावळा मार्गावरील लोकल गाड्यांची मागणी सध्या वाढते आहे. त्यामुळे या मार्गावर लोकलची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पुणे- मुंबई दरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मुंबईसाठी आणखी गाड्या देण्याचीही मागणी कायमची आहे. मात्र, मार्गाची सद्य:स्थिती पाहता एकही नवी गाडी सुरू होऊ शकणार नसल्याचे चित्र आहे.

पुणे-लोणावळा या मार्गावर दिवसाला तब्बल 160 गाड्या ये-जा करीत असताना त्यांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवून गाड्या वेळेवर धावण्यासाठी रेल्वे प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या विस्तारीकरणाची गरजही अधोरेखित झाली असून, हे काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

लांब पल्ल्याच्या नव्या गाड्यांना या मार्गावरून जागा करून देणेही मोठे जिकिरीचे झाले आहे. अशा स्थितीमध्ये लोकल गाड्या 15 ते 20 मिनीटे थांबवून ठेवल्या जात आहेत. त्याचा फटका रोज चाकरमान्यांना बसत आहे. तर दुसऱ्या बाजूला पुणे- लोणावळा मार्गाच्या विस्तारीकरणाची चर्चा मागील 15 वर्षांपासून सुरू आहे. विस्तारीकरणाच्या कामाचा रेल्वे अर्थसंकल्पातही समावेश करण्यात आला आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने हे काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, हा प्रकल्प अत्यंत संथगतीने पुढे जात असल्याचे वास्तव आहे.

मुंबईच्या धर्तीवर सुधारणा अपेक्षीत
मुंबई येथे दर दोन मिनीटाला लोकल धावतात. तसेच लोकल लेट होण्याचेही प्रमाण खूप कमी असते. याबरोबरच मुंबई येथे लोकलला 15 डब्बे असतात तर पुण्यातील हीच डब्ब्यांची संख्या 12 एवढी आहे. त्यात नियोजीत डब्ब्यातील एक डब्बा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुरुष प्रवाशांनीही होणाऱ्या गर्दी बाबत तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेजारीच असणाऱ्या मुंबईचा काही आदर्श घेणार का, असा प्रश्‍न प्रवासी उपस्थित करीत आहेत.

तुर्तास गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे शक्‍य नाही. मात्र एक्‍सप्रेस व मालवाहू गाड्यांचा ताण या मार्गावर येत आहे. त्यामुळे मार्ग दुरुस्तीसाठी आम्हाला “ब्लॉक’ ठेवावे लागत आहेत. त्यामुळे वेळेवर आहेत गाड्या सोडण्यासाठी आमची कसरत सुरु आहे. तसेच नागरिकांच्या मागणी वाढली तर भविष्यात तसा विचार केला जाईल.
– मनोज झंवर, मध्य रेल्वे प्रशासन, प्रवक्‍ते.

लोकलच्या फेऱ्या वाढवणे नितांत गरजेचे आहे. 42 वर्षे झाले तरी तिसऱ्या लाईनचे काम प्रशासनाने सुरु केले नाही. “ऑटोमॅटीक सिग्नल’साठीही त्यांना अद्याप मुहूर्त मिळाला नाही. मुंबईला साडे तीन हजार लोकलच्या फेऱ्या आहेत पुणे-लोणावळा मार्गावर किमान 100 फेऱ्या तरी करा. त्यात दुपारी साडेबारा ते तीन वाजेपर्यंत गाड्या बंद असतात. त्याचा फटकाही प्रवाशांना बसत आहे. तर लोकलला केवळ 12 डब्बे आहेत. ते देखील मुंबईचे जुने डब्बे जोडले जात आहेत.
– हर्षा शहा, सदस्या, रेल्वे प्रवासी मंच.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)