लोकमान्य आणि लोकशाहीर अभिवादन 

विलास पंढरी 

आज 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळकांची 98 वी पुण्यतिथी तर प्रसिद्ध शाहीर आणि मराठी साहित्यिक अण्णा भाऊ साठेंची 98 वी जयंती. त्या निमित्ताने या दोन्ही मराठी सुपुत्रांच्या अलौकिक जीवनाचा थोडक्‍यात घेतलेला आढावा. 

लौकिकदृष्टीने शाळेत न गेल्याने अशिक्षित असूनही मोठी साहित्य निर्मिती करणारा महाराष्ट्राचा एक सुपुत्र म्हणजे तुकाराम भाऊसाहेब उर्फ अण्णाभाऊ साठे. 1 ऑगस्ट ही लोकमान्यांची पुण्यतिथी तर या अण्णाभाऊ साठ्यांची जयंती. 1 ऑगस्ट 1920 रोजी एका दलित व अशिक्षित कुटुंबात सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे अण्णांचा जन्म झाला. साठे हे शाळेत शिकलेले नाहीत, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले.नंतर तेथील भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. अशिक्षित बहिणाबाई नाही का प्रसिद्ध कवयित्री म्हणून नावारुपाला आल्या?. आणाभाऊ साठेही शाळेतच न गेल्याने अशिक्षित राहिले.पण त्यांनी निर्मिलेले प्रचंड साहित्य कसे निर्माण केले असावे हे आकलनाच्या पलीकडचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा समाविष्ट आहे.तिला राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचे 15 संग्रह आहेत. त्यांच्या साहित्याचे मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि अनेक अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी 3 नाटके , रशियातील भ्रमंती हे प्रवासवर्णन, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील 15 गाणी लिहिली आहेत.साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरूद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले. नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून अटक करून छळ केला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते असे या कादंबरीचे कथानक आहे.

साठे सुरुवातीला कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित होते.भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे मोर्चा काढला आणि त्या मोर्चातील घोषणा होती, “ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!” भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा असलेल्या इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनचेही ते सभासद होते, जिने संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती. साठे नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांनी कथांचा वापर केला. 1958 मध्ये मुंबईत स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्‌घाटनपर भाषणात त्यांनी म्हटले होते की, “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे” असे म्हणून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. त्या काळातील साठेंचे कार्य मार्क्‍सवादाच्या प्रभावाखाली होते. 1ऑगस्ट 2001 रोजी भारतीय पोस्ट खात्याने विशेष टपाल तिकीट त्यांच्यानावे काढले होते.

लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य लढा सुरू करणारे पहिले मोठे नेते होते म्हणूनच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते.स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” असे म्हणणारे टिळक स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा हयात नव्हते. महाराष्ट्र सरकारने टिळकांनी अखेरचा श्‍वास घेतला त्या सरदारगृहाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याचे आश्‍वासन तर दिले आहे.

या निमित्ताने लोकमान्यांच्याही काही वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणे उद्बोधक ठरेल.” कोणतेही काम करताना ते काम जगा म्हणजे तुमच्या हातून जे होईल ते फक्त सर्वोत्कृष्टच हा सध्याच्या मॅनेजमेंट विश्‍वातील एक मूलभूत नियम,जो एकोणिसाव्या शतकात लोकमान्यांनी जगून दाखवला. लोकमान्यांच्या बहुआयामी व्यक्‍तिमत्वाबद्दल जेवढे सांगावे तेवढे थोडेच ठरेल. ते एक गणितज्ज्ञ होते, पत्रकार होते, ज्योतिषाचा अभ्यास होता त्यांचा व ते अंतराळतज्ज्ञही होते. आपल्या सर्वांगीण इतिहासाचा अभ्यास असणारे इतिहासतज्ज्ञ होते. मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ होते,जहाल क्रांतिकारक होते, शिक्षणसंस्था सुरु करणारे शिक्षकमहर्षी होते, कृष्णाचे कीर्तन करणाऱ्या चाफेकरांना साक्षात कृष्णाचे जीवन जगायला प्रोत्साहन देणारे राजनीतिज्ञ होते. सावरकरांसारख्या क्रांतिकारकांना ब्रिटनमध्ये जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करणारे एक गुरु होते.

समुद्र पार केला म्हणून काशीला जाऊन प्रायश्‍चित्त घेणारे कर्मठ होते तर महर्षी कर्व्यांच्या स्त्री शिक्षणाचे कौतुक करणारे उदारमतवादीही होते. डॉ आनंदीबाई जोशींना त्यांच्या शेवटच्या काळात मदत करणारे स्त्री पुरुष समानतेचे खंदे पुरस्कर्ते होते. राजद्रोहाच्या खटल्यात स्वतःची बाजू स्वतः मांडणारे कुशल वकील होते, ज्यांच्यासाठी मोहम्मद अली जिना ह्यांच्यासारखा मुसलमान रस्त्यावर आणि न्यायालयात लढत असे, असे हिंदू-मुस्लीम एकतेचे खरेखुरे मूर्तिमंत प्रतीक होते. ते नंतरही कराचीत पुतळा असणारे एकमेव हिंदुस्थानी नेते होते. त्यांना तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी असेही म्हटले जायचे. ते बालगंधर्वांसारखी भेट महाराष्ट्राला देणारे एक रसिकराज होते, शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू करून समाजाला एकत्र आणणारे खरेखुरे समाजसेवक होते, ते शिवसेवक आणि शिवभक्तही होते. सहकारी बॅंक सुरू करणारे सहकारमहर्षी होते. तळेगाव येथे काच कारखाना सुरू करणारे स्वदेशी उद्योजक होते, ब्रिटनमध्ये गेल्यावर आपल्या वर्तमानपत्रासाठी मशिनरी विकत घेऊन ती शिकणारे तंत्रज्ञ आणि ती पत्राद्वारे भारतात शिकवणारे एक यशस्वी मॅनेजिंग डायरेक्‍टर होते. आपल्या वर्तमानपत्रात सरळ सरळ इंग्रजांविरुद्ध लिहिणारे फटकळ कोकणस्थी होते, झनाना मिशन प्रकरणात आपल्या कुटुंबीयांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना जपणारे आणि त्याही काळात आपल्या मुलीचे लग्न व्यवस्थित आणि साग्रसंगीत करणारे कुटुंबवत्सल पुणेकरही होते. म्हणजेच टिळक हे गीतेत वर्णन केल्याप्रमाणे एक कर्मयोगी पुरुषोत्तम होते .

असे जीवनाच्या सर्वांगाने काम करताना त्यातून टिळक फक्त एकच साधत होते ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य आपल्या गीतारहस्यात टिळकांनी गीतेतला जो कर्मयोग विशद करून लोकांना सांगितला. तो टिळक जन्मभर जगले. एक ऋषितुल्य जीवन टिळक जन्मभर जगले. म्हणूनच 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचे देहावसान झाल्यावर टिळकांच्या अंत्ययात्रेला लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. अशा नावातच लोकमान्यता असलेल्या सुपुत्राला आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विनम्र श्रद्धांजली वाहताना सुचवावेसे वाटते की, या दोन्ही महान सुपुत्रांचा आपल्याला खरंच मनापासून सन्मान करायचा असेल तर सगळ्यांनीच आजच्या दिनाच्या निमित्ताने साठेंचीही जयंती साजरी केली पाहिजे व टिळकांची पुण्यतिथी पाळून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)