लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हे एकाच गाडीची दोन चाके : चंद्रकांत दळवी

परिषदेच्या वतीने विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी चा सपत्नीक गौरव

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 24 – लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हे एकाच गाडीची दोन चाके आहेत. त्याच्यातील समन्वयामुळे विकासकामे उभी राहतात. प्रशासकीय सेवेत काम करताना पत्नीची मोलाची साथ मिळाली, तिने त्याग केला म्हणून मी चांगले काम करू शकलो. कारण, 10 ते 6 या वेळेत काम करणे म्हणजे पाट्या टाकणे. त्यामुळे वेळेचे भान न ठेवता कामाला प्राधान्य दिले पाहिजे, तरच त्यातून चांगले काम घडते, असे मत विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.

विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी हे येत्या 30 मार्च रोजी प्रशासकीय सेवेतून निवृत्त होत आहे. त्यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील, महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, समाजकल्याण समितीच्या सभापती सुरेखा चौरे, कृषी व पशु समितीच्या सुजाता पवार, बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रविण माने, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, प्रकल्प संचालक दिनेश डोके, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर यासह जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

प्रशासनातील खडान खडा मला माहिती आहे. मात्र, घरातले काहीच माहिती नसते. प्रशासकीय सेवेत काम करताना पत्नीने त्याग केल्यामुळे मी चांगले काम उभे करू शकलो, अशा भावना व्यक्त करताना चंद्रकांत दळवी क्षणभर भाऊक झाले. ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय असते. तर पुणे जिल्हा परिषद ही राज्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद आहे. प्रशासनात काम करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची साथ असेल तर कामात अडथळा येत नाही. त्यासाठी ज्या ठिकाणी मी जाईल त्याठिकाणी प्रथमत: तेथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रश्‍नांमधे झिरो पेंडन्सी करतो. त्यामुळे आपोआप कार्यालयातही झिरो पेंडन्सी होते.

विश्‍वासराव देवकाते म्हणाले, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले दळवी साहेब यांनी त्यांच्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी नेहमी भूमीपुत्रांचा विचार केला. सुरज मांढरे म्हणाले, राज्य सेवेतील आयडॉलमध्ये चंद्रकांत दळवी हे आमचे आयडॉल आहेत. शरद बुट्टेपाटील म्हणाले, निधी नसताना विकासकामे कशी करायची हे दळवी यांनी दाखवून दिले. उंची गाठत असताना कर्तुत्व पाहतो, प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. त्याप्रमाणे दळवी यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नीची मोलाची साथ मिळाली, असे मत आशा बुचके यांनी व्यक्त केले. यावेळी शरद लेंडे, विठ्ठल आवारे यांनी मनोगत व्यक्त केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)