लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

उपनगर टीम – सकल मराठा क्रांती मोर्चाचे सध्या आंदोलन सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून आंदोलकांनी शहरातील आमदार व खासदार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले.
खासदारांच्या घरासमोर घोषणाबाजी
वाकड- बुधवार दि. 8 रोजी सकाळी दहाच्या सुमारास शिवसेनेचे मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांच्या थेरगाव येथील निवास स्थानासमोर मराठा मोर्चा ठिय्या आंदोलन करणार आहे. आंदोलकांनी घोषणाबाजी व घंटानाद यावेळी केला. श्रीरंग बारणे संसदीय कामकाजानिमित्त दिल्लीत असल्याने त्यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला. मी नेहमीच सकल मराठा समाजाच्या बाजूने आहे. संसदेतसुद्धा मराठा समाजाची बाजू मांडली आहे, असे सांगितले. सकल मराठा मोर्चाकडून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे यांनी निवेदन स्‍वीकारले. कसलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून वाकड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

राजीनाम्याला घाबरणारा आमदार मी नाही
पिंपळे गुरव – सकल मराठा मोर्चाच्यावतीने बुधवारी ( दि.8)सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानासमोर घंटानाद आंदोलन केले. तसेच मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आमदारांना निवेदन दिले. यावेळी मारुती भापकर, जीवन बोऱ्हाडे, नकुल भोईर, राजेंद्र देवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन स्वतः निवेदन स्वीकारले. त्यावेळी भापकर यांनी आमदारांना राजीनामा देण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, “राजीनाम्याला घाबरणारा आमदार मी नाही. मात्र राजीनाम्याने प्रश्‍न सुटणार नाही. मराठा समाजाच्या मागण्यासाठी आपण विधानसभेत पाठपुरावा करणे गरजेचे आहे.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमदार लांडगेंचे संबोधन
भोसरी- मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी भोसरी येथील आमदार महेश लांडगे यांना निवेदन दिले. तत्पूर्वी त्यांच्या निवास स्थानासमोर देखील ठिय्या आंदोलन केले. आमदार लांडगे यांनी स्वतः निवेदन स्वीकारले आणि आंदोलकांना संबोधित केले.

खासदारांच्‍या वतीने कन्‍येने स्‍वीकारले निवेदन
निगडी- राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या निवास स्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केले. यावेळी खासदार अमर साबळे उपस्थित नसल्याने त्यांची कन्या वेणू साबळे यांनी निवेदन स्वीकारले.

आंदोलकांच्‍या मागण्या
आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींकडे सोपवले. यात सकल मराठा समाज पिंपरी-चिंचवड शहरने काही मुख्य मागण्या केल्या आहेत. मराठा आरक्षणाबाबत योग्य कारवाई करून विलंब न लावता जाहीर करावे, अशी प्रमुख मागणी आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न न्यायालयात असून मराठा संबंधित डाटा/माहिती राज्य मागास आयोगाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेला आहे. राज्य मागास आयोगाने त्‍यांचा अहवाल लवकर द्यावा, यासाठी शासनाने आवश्‍यक ती सर्व साधन सामग्री, संशोधक, अभ्यासक, विधीतज्ज्ञ, असेल तर ती तातडीने आयोगाकडे देण्यात यावी. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सर्व बाजूनी आवश्‍यक ती कार्यवाही करावी.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजनेबाबतच्या मागणीत म्हटले आहे की, आरक्षण नसल्याने मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळत नाहीत. जोपर्यंत मराठा आरक्षण होत नाही, तोपर्यंत आरक्षण सोडून उरलेल्या सर्व सवलती मराठा विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत. ओबीसी विद्यार्थ्यांना जेवढ्या सवलती मिळतात, त्या सर्व सवलती ईबीसीला लागू करण्यासाठी जीआर काढण्यात आल्याप्रमाणे सुमारे 551 कोर्सेसचा समावेश झाला आहे. अनेक महाविद्यालये शंभर टक्‍के फी आकारुन प्रवेश देत असल्याची तक्रार शासनाकडे आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना 50 टक्‍के शुल्क आकारुन प्रवेश द्यावा, यासाठी आवश्‍यक ती कारवाई अशा महाविद्यालयांवर करावी. डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेची व्याप्ती वाढवावा. प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी शासनाने जाहीर केलेले 500 विद्यार्थ्यांचे वसतीगृह बांधण्याचे काम सुरू करावे. मराठा भवनसाठी शासकीय जमीन द्यावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मराठा कुणबी ओबीसी जात प्रमाणपत्र, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थांबाबतही मागण्या करण्यात आली.
नव्याने होणाऱ्या शासकीय नोकर भरतीत ईएसबीसी प्र-वर्गाच्या जागा 16 टक्‍के संरक्षित कराव्यात. या प्र-वर्गातून यापूर्वी नोकरीत लागलेल्या उमेदवारांना शासकीय सेवेत कायम करावे. अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदीचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरसकट कर्जमुक्‍ती व शेती मालास हमीभाव मिळणे व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे, अशा मागण्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)