लोकपालाची मागणी म्हणजे नवीन नाटक; राष्ट्रवादी कॉंग्रेसची टीका

अण्णा हजारे संघाची कळसूत्री बाहूली

मुंबई – तीन वर्षे झाली तरी देशभरात लोकपालांची नियुक्ती न केल्याबद्दल केंद्र सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने टिका केली आहे. संघाची कळसूत्री बाहूल्याप्रमाणे काम करणारे अण्णा हजारे झोपेतून जागे झाले असून त्यांनी लोकपालांच्या नियुक्तीची मागणी केली आहे. लोकपालची मागणी म्हणजे अण्णा आणि संघाचे नवीन नाटक असून ते लवकरच पाहायला मिळेल, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला.

लोकपाल नियुक्तीसंदर्भात सुप्रिम कोर्टात जनहित याचिकेवर सुनावणी सुरु आहे. सुप्रिम कोर्टाचा निर्णय लवकरच येईल आणि सरकार लोकपाल नियुक्त करतील. पण केवळ श्रेय लाटण्यासाठी अण्णा संघाच्या इशाऱ्यावर जागृत झाले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

मागच्या वेळीही संघाच्या सहभागाने, त्यांच्या मार्गाने अण्णांनी आंदोलन केले होते. लोकपालांची आता नियुक्ती होईल आणि अण्णा त्याचे श्रेय घेऊन सरकारची पाठ थोपटतील, असे सांगत हे एक लिखित नाट्य असून ते लवकरच पहायला मिळेल, असेही ते म्हणाले. अण्णा कायमच संघाच्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे काम करत आलेत. नजीकच्या काळात त्यांचे हे नाटक पुन्हा पाहायला मिळणार आहे, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यपाल राजीनामा देतील का?
लोकपालांच्या नियुक्तीसाठी देशाच्या संसदेने कायदा बनवला. पण, मोदी सरकार आल्यानंतर आजपर्यंत लोकपालांची नियुक्ती झालेली नाही. लोकपालला जोकपाल बोलणारे लोक राज्यपाल पदावरून राजीनामा देतील का, मंत्रीमंडळात सहभागी असलेलेही अण्णांच्या आंदोलनात भाग घेतील का, असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)