श्रीनिवास पाटील : मराठी लोककला संमेलनाचे उद्घाटन
शाहीर पठ्ठे बापुरावनगरी, चिंचवड – लोककला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती प्रबोधनाची जननी आहे. ही कला मातीशी इमान राखायला शिकवते. यातील लोककलावंत जीवनाचे तत्वज्ञान मांडतो. म्हणूनच ही कला लोकांना अधिक आवडते, असे उद्गार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले. आपल्या सत्तावीस मिनिटाच्या मनोगतात अगदी पठ्ठे बापूरावपासून ते अण्णाभाऊ साठे, रोशन सातारकर आदीपर्यंतच्या लोककलावंतांच्या कलाकृतीचा परामर्श खास आपल्या खुमासदार शैलीत घेतला.
पिंपरी-चिंचवड महापालिका, लोकरंग सांस्कृतिक मंच आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसछया अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे उद्घाटक म्हणून श्रीनिवास पाटील बोलत होते. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील शाहीर योगेश व्यासपीठावर पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे, श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनी पाटील, महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर, लोकरंग सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष प्रकाश खांडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला अकादमीचे प्रमुख प्रवीण भोळे, महापालिकेचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.
श्रीनिवास पाटील म्हणाले, लोककला ही क्षणभर मनाला रुंजी घालते, थकलेल्या मनाला गारवा देते. त्याचप्रमाणे मनाचे आणि जनाचेही प्रबोधन करण्याची ताकद या कलेमध्ये आहे. जीवनामध्ये तत्वज्ञान मांडण्याची कला लोककलाकारामध्ये आहे. मनाला आवडले की, ते जनात जाते आणि जनातून लोकांमध्ये गेले की, ती लोककला होते. मिठापुरती चव आणणारी लोककला प्रत्येकाच्या जिवनामध्ये असलीच पाहीजे. दाद दिल्याशिवाय कलावंत घडत नाही. कलावंताच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहीजे. पूर्वी राजाश्रय होता, आता या कलेसाठी आणि कलावंतांसाठी लोकाश्रयाची गरज आहे. बदलत्या काळानूसार लोककलावंताच्या पाठीशी उभे राहीले पाहीजे. पठ्ठे बापुराव आणि बालगंधर्व म्हणजे महाराष्ट्राला पडलेली दोन सुंदर स्वप्ने आहेत. पण, ती पहाटेची स्वप्ने ठरली. पठ्ठे बापुराव यांच्या समग्र कलाकृतीचे संग्रहालय व्हायला हवे, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.
विख्यात लावणी कलावंत, चित्रपट अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव, तर प्रसिद्ध लोककला साहित्यिक प्रभाकर मांडे यांना कलागौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे लोककला क्षेत्रातील विविध कलावंतानाही यावेळी गौरविण्यात आले. महापौर काळजे यांनी स्वागत, भाऊसाहेब भोईर यांनी प्रास्ताविक, तर नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश खांडगे यांनी आभार मानले. उद्घाटनापूर्वी महानसाधू मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिरापासून ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये बहुरूपी, वासुदेव, पिंगळा, कडकलक्ष्मी, धनगर, बालवारकरी, कीर्तनकार, गण-गवळण, पोतराज, गोंधळी आदी विविध लोककलावंत पारंपारीक वेशभुषेत सहभागी झाले होते.
लोककलांचे विद्यापीठ व्हावे – डॉ. देखणे
लोककलेकडे लोकसाहित्य म्हणून पहा, त्यांच्या वाङमयाचे संशोधन करा, त्यासाठी लोककलांचे विद्यापीठ व्हावे, अशी अपेक्षा संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये उपेक्षित लोककला आणि लोककलावंताच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत, या लोककला व कलावंतांना जगविण्याची जिम्मेदारी लोकांची आहे, असे मत डॉ. देखणे यांनी व्यक्त केले. लोककला ही केवळ मनोरंजन नाही. या लोककलेचे शरीर मनोरंजनाचे असले, तरीही आत्मा प्रबोधनाचा आहे. लोककलावंत हे लोकधर्माचे पुरोहीत आहेत आणि त्यांचे साहित्य हे लोक विद्यापीठे आहेत. शिक्षणाने माणूस साक्षर होतो. मात्र, लोककलावंत समाजाला भावसाक्षर करतो. परंतु, लावणी, तमाशा आणि अन्य लोककलांचा हल्ली ऑर्केस्ट्रा झाला आहे. ही लोककला व कलावंत जगला पाहीजेत. त्यासाठी प्रत्येक विद्यापीठात व प्रत्येक जिल्ह्यात लोककला अकादमी व्हायला पाहीजे, असेही डॉ. देखणे म्हणाले.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा