मालेगाव स्फोट प्रकरणात आपल्या अटकेच्या चौकशीची केली होती मागणी
नवी दिल्ली – मालेगाव स्फोट प्रकरणात आपले अपहरण करून करण्यात आलेली अटक आणि आपल्या छळाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेचा विचार करण्यास नकार दिला आहे. न्या रंजन गोगोई, नवीन सिन्हा आणि न्या के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय दिला.

तथापी न्यायालयाने कर्नल पुरोहित यांना या प्रकरणी ट्रायल कोर्टात अर्ज करण्यास अनुमती दिली आहे. या प्रकरणाची तेथे आधी सुनावणी होऊ द्या. त्यात आम्ही सध्या हस्तक्षेप करणे योग्य ठरणार नाही असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.या याचिकेत पुरोहित यांच्यावतीने हरीष साळवे यांनी युक्तिवाद केला होता तथापी त्यावर कोणतेही भाष्य करण्यास न्यायालयाने नकार दिला.

आम्ही यावर काही भाष्य केले तर ट्रायल कोर्टातील खटल्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. सन 2008 साली झालेल्या मालेगाव स्फोट प्रकरणात ले. कर्नल पुरोहित हे सध्या जामीनावर सुटले असून गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)