लेबर कॅम्पवर बांधकामाचे ब्लॉक पडल्याने मजूर ठार
– अन्य एक मजूर आणि चिमुकला गंभीर जखमी
– एप्रिलमधील घटनेचा गुन्हा मे मध्ये दाखल

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 22 – टेरेसच्या पॅराफिट्‌सचे बांधकामाचे ब्लॉक 11 व्या मजल्यावरुन लेबर कॅम्पवर पडून एका बांधकाम मजूराच्या मृत्यू झाला. या दुर्घटनेत तर एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला. ही घटना येवलेवाडी येथील द्वारिका बांधकाम साईटमधील बिल्डिंग-बी शेजारी घडली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक, अभियंता, ठेकेदार आणि सुरक्षा पर्यवेक्षक यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 17 एप्रिल रोजी रात्री घडली होती.

अनबर ताजुद्दीन आलम (22, रा.द्वारिका लेबर कॅम्प, येवलेवाडी) असे मृत कामगाराचे नाव आहे. तर दुर्गेश पुसव निसाद (25) व मुलगा परमेश्‍वर दुर्गेश निसाद (4) हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन गुन्हा दाखल केला आहे. येवलेवाडी येथे साई द्वारिका बांधकाम येथे 11 व्या मजल्यावरील टेरेसवर बांधकाम सुरू असलेल्या साईटवर मजुरांकडून काम करुन घेताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच साधन सामग्री पुरवण्यात आली नव्हती. तसेच इमारतीच्या टेरेसवरील पॅराफिटचे कमकुवत बांधकाम करण्यात आले होते. यामुळे गुरुवारी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे बांधकामाचे ब्लॉक हे इमारतीलगत असलेल्या लेबर कॅम्पवर पडले. यावेळी लेबर कॅम्पमध्ये असलेल्या अनबर आलमचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुसरा कामगार दुर्गेस पुसाव व त्याचा मुलगा परमेश्‍वर पुसाव हे गंभीर जखमी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)