लेटर्स फ्रॉम युरोप: इजिप्तमधून सलाम आलेकुम…

श्‍वेता पटवर्धन

कायरो, इजिप्त
प्रिय जिज्ञासा,
मला कल्पना आहे की, तुला कोणी पाठवलेले हे कदाचित पहिले पत्र असेल. पत्रलेखन हा प्रकार काळाच्या मानाने अतिशय संथ आहे, हे मला मान्य आहे. पण संथ गोष्टीत पण मजा असते. स्लो मोशन व्हिडीओ तुला उगाच का आवडतात? म्हणूनच पत्रलेखनाशी अनभिज्ञ असणाऱ्या आजच्या कूल पिढीतील तुला मी पत्र लिहिणार आहे. आणि पत्रांचा विषय काय माहितीये? इजिप्त. मी घरून निघताना तू मला असंख्य प्रश्‍न विचारलेस. त्यांची माझ्याकडे उत्तरं नव्हती कारण इजिप्तबद्दल मलादेखील काहीच माहिती नव्हती. इजिप्त म्हटलं कि पिरॅमिड्‌स, ममीज्‌ आणि फारतर नाईल नदी इथेच आपली माहिती संपते. पण आता हळूहळू काही उत्तरं मिळत आहेत; काही नवीन प्रश्‍नही पडतायत. ते सगळे तुझ्याशी शेअर करण्यासाठी ही पत्रं!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इजिप्त ही जगातील एक प्राचीन संस्कृती. प्राचीन इजिप्तमध्ये ओल्ड किंग्डम आणि न्यू किंग्डम असे दोन राजवंश होऊन गेले. त्यानंतर लीबिअन्सनी इजिप्तवर आक्रमण केले. अलेक्‍झॅंडर-द ग्रेट यानेही येथे राज्य केले. नंतर जगप्रसिद्ध क्‍लेओपात्रा राणीने हे राज्य हाती घेतले व ते ग्रिको-रोमन साम्राज्य झाले. मध्ययुगात अरब त्यावर राज्य करत होते. परंतु परकीय राजवटींपासून ते फार काळ दूर राहू शकले नाहीत. काही वर्षं इंग्रज आणि मग फ्रेंच तिथे राज्य करून गेले. अखेरीस 1953 साली इजिप्त प्रजासत्ताक राज्य (रिपब्लिक) झाले. आज इजिप्तचे नाव “अरब रिपब्लिक ऑफ इजिप्त’ असे आहे.

दोन खंडांत विभागला गेलेला इजिप्त हा एकमेव देश असावा. इजिप्तचा बहुतेक भाग आफ्रिकेत येतो पण सायनाय नावाचा एक प्रदेश मात्र आशिया खंडात येतो. सायनाय आणि इजिप्तला जोडणारा कालवा म्हणजे जगप्रसिद्ध सुएझ कॅनॉल. इजिप्त मुख्यतः वाळवंट आहे. त्यामुळे पिकाऊ जमीन कमीच. पण इजिप्तला नाईल नदीची अभूतपूर्व देणगी लाभलेली आहे. नाईल नदी जगातील सर्वात लांब नदी आहे, हे तू शाळेच्या पुस्तकात वाचलेच असशील. पण नाईल नदीला पाणीही खूप आहे. मुळा-मुठा पाहणाऱ्या पुणेकरांना नाईल सुखद धक्‍का देते. दहा देशातील रहिवाशांना तृप्त करून ती इजिप्तमध्ये येते आणि नंतर मेडिटेरियन समुद्राला जाऊन मिळते. इजिप्तचे जनजीवन या नदीवर अवलंबून आहे. म्हणूनच इजिप्तमधील बहुतेक लोकसंख्या नाईल नदीच्या काठावर विसावली आहे. त्यामुळे इजिप्तची राजधानी कायरो आणि इतर काही शहरात, अर्थात फक्त 3% भूभागावर, 98% लोक एकवटले आहेत.

या देशात नदी बरोबरच प्रचंड मोठं वाळवंट आणि समुद्र आहे. सहारा वाळवंटाचा इजिप्तचाच एक भाग आहे. इजिप्तच्या उत्तरेला मेडिटेरियन समुद्र आणि पूर्वेला रेड सी आहे. इजिप्त अरब राज्य असल्यामुळे तेथील धर्म इस्लाम आणि भाषा अरबी. तेथील खूप थोडे लोक इंग्रजी बोलतात किंवा समजू शकतात. या पत्रात इजिप्तबद्दल मी खूप धावती माहिती दिली आहे आणि त्यामुळे तुझ्या प्रश्‍नांची यादी वाढली असणार याची मला पूर्ण कल्पना आहे. पण काळजी करू नकोस तुला कुतूहल असलेल्या सगळ्या विषयांकडे मी हळूहळू येणार आहे.

तुझी
प्रवासी मावशी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)