लेटर्स फ्रॉम इजिप्त : “गिझा’बद्दल थोडेसे… 

श्‍वेता पटवर्धन 

प्रिय जिज्ञासा,
इजिप्तबद्दलची सर्वज्ञात असलेली गोष्ट म्हणजे पिरॅमिड्‌स. त्याचे चित्र तू नक्कीच बघितले असशील. महाकाय त्रिकोणाकार बांधणी असलेले स्मारक पहिल्यांदा 2600 बीसीच्या आसपास बांधले गेले. इम्होतेप नावाच्या एका आर्किटेक्‍चरने सक्कारा येथे पहिले पिरॅमिड्‌स बांधले, असे म्हणतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इजिप्तच्या राजांना, फारोंना, पुनर्जन्मावर गाढा विश्‍वास होता. त्यांची अशी श्रद्धा होती की, मृत्युनंतर त्यांचा आत्मा अंशतः स्वर्गात जाईल पण अंशतः शरीरात राहील.

पुढील जन्मी त्या आत्म्यासाठी ते त्यांचे शव ममी बनवून ठेवत. स्वतःची ममी सुरक्षित जागी ठेवण्यासाठी फारोंनी त्यांच्या हयातीतच पिरॅमिड्‌स बांधून घेतले. ते त्रिकोणी आकाराचे आहेत आणि त्यांना पायऱ्यादेखील आहेत. त्या पायऱ्यांवरूनच आत्मा स्वर्गात जातो असा त्यांचा समज होता. हे पिरॅमिड्‌स जसे उंच आहेत, तसेच ते खोलदेखील आहेत. तिथे खाली तुम्ही उतरू शकता, पण तिथे उतरायला जिना नाही. केवळ लाकडी फळी आहे आणि सरळ उभे राहण्याएवढी त्यांची उंची नाही. त्यामुळे तेथे उतरणे थोडे जिकरीचे होते. एवढा द्राविडी प्राणायाम करून खाली उतरल्यावर तेथे बघायला मात्र आता काही राहिले नाही. फारोंनी तेथे त्यांची ममी ठेवण्यासाठी खोली बांधली. त्या खोलीत ममी बरोबरच जीवनावश्‍यक सर्व गोष्टी व इतर खजाना ठेवला.

दुर्दैवाने मधल्या काळात सगळे लुटले गेले आहे. ज्या काही थोड्याफार ममीज इजिप्त सरकारला तेथे सापडल्या त्या त्यांनी कायरोच्या संग्रहालयात ठेवल्या आहेत.

पहिले पिरॅमिड्‌स सक्‍काराला जरी बांधले गेले असले तरी सर्वात प्रसिद्ध पिरॅमिड्‌स कायरो जवळ गीझा येथे आहेत. सर्वाधिक पर्यटक गीझा पिरॅमिड्‌सना भेट देतात. त्याचे कारणही तितकेच खास आहे. गीझामधील तीन पिरॅमिड्‌सपैकी सर्वात उंच, खुफू पिरॅमिड्‌ जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक आहे. पिरॅमिड्‌स हे असे एकमेव आश्‍चर्य आहे जे जुन्या सात आश्‍चर्यांमधून नवीन यादीतही समाविष्ट केले आहेत.

खुफूच्या तीन राण्यांचे छोटे पिरॅमिड्‌सही तेथे आहेत. त्याशिवाय खाफ्रे आणि मेनाकोर असे आणखी दोन पिरेमिड्‌स त्याच आवारात बांधले गेले. खाफ्रे पिरेमिडचे शिखर पूर्वी सोन्याचे होते. म्हणून आजही ते थोडे वेगळे वाटते. पण जिथे आतला खजिना राहिला नाही, तेथे सोन्याचे शिखर काय राहणार?

पिरॅमिड्‌सच्या समोर मानवी चेहरा आणि सिंहाचे शरीर असलेला एक पुतळा आहे. त्याला स्फिंक्‍स असे म्हणतात. हा स्फिंक्‍स नक्की कोण आहे आणि तो तेथे का आहे यावर बरीच मतमतांतरे आहेत. बरेच जण असे मानतात की, स्फिंक्‍स इजिप्तमधील विविध फारोंचे प्रतीक आहे. तर काहीजण स्फिंक्‍सला पिरॅमिड्‌सचा रक्षणकर्ता मानतात. स्फिंक्‍सचे नाक आणि दाढी काळाच्या ओघात हरवली आहे. पण ती कशी हरवली याबद्दल एकवाक्‍यता नाही. प्रचलित समज असा आहे की, त्याचे नाक नेपोलियनच्या सैनिकांनी उडवले. परंतु हे सगळे फक्‍त अंदाज आहेत.

तू कदाचित असा विचार करत असशील की, पिरेमिड्‌स आणि स्फिंक्‍स इतके पुरातन आहेत आणि लुटले गेले आहेत; तरी इतके पर्यटक तेथे गर्दी का करतात?

जिज्ञासा, पिरॅमिड्‌स जरी लुटले गेले असले तरी त्याची बांधणी अबाधित आहे. इतक्‍या वर्षांपूर्वी इतकी प्रचंड आकृती उभी केली कशी याचे कोडे अजून पूर्णतः सुटलेले नाही. शिवाय एवढ्या अवाढव्य आकृतीसमोर उभे राहण्याचा अनुभव विलक्षण असतो.

पिरॅमिड्‌समध्ये खाली आता जरी ममीज नसल्या तरी तुम्ही इतके फूट खाली गेल्यावर तुम्ही पृथ्वीच्या गर्भात असता आणि तिथे 5-10 मिनिटांपेक्षा जास्त काळ उभे राहणेदेखील क्‍लॉस्ट्रोफोबिक (गुदमरुन टाकणारे) होते. सात आश्‍चर्यांपैकी एक असलेले पिरॅमिड्‌स स्वतः पाहणे हाच एक विलक्षण योग आहे. त्यामुळे पिरॅमिड्‌सचा इतिहास जाणून घ्यायला तिथे एक वारी नक्कीच केली पाहिजे.
तुझी,
प्रवासी मावशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)