लेखनातून वास्तवाचे दर्शन व्हावे – डॉ. देशमुख

चिंचवड – परिवर्तन हा समाजाचा स्थायीभाव असला पाहिजे. अहंकार आणि न्यूनगंड या दोन्ही बाबी टाळून वास्तवाचे दर्शन लेखनातून व्हावे, असे विचार 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख व्यक्‍त केले.

काशीधाम मंगल कार्यालय येथे ज्येष्ठ साहित्यिक विलास राजे लिखित आणि संवेदना प्रकाशननिर्मित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शब्दरूप (चारोळीसंग्रह), भावस्पर्श (कवितासंग्रह), प्रजापती कुंभार (संकीर्ण), चैतन्याचा जिव्हाळा (लेखसंग्रह), झिपरी (कादंबरी), असे घडले पुणे (संकीर्ण), माणस मराठी मुलखातली (संकीर्ण) आणि कथाकलश (कथासंग्रह) या आठ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिज्जत पापड उद्योगसमूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, ह.भ.प. रायबा गायकवाड, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, कृष्णकांत ढाणे, प्रकाशक नितीन हिरवे, विलास राजे, संजय राजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

-Ads-

डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, बहुश्रृतता, व्यासंग यातून वस्तुनिष्ठ लेखनाचा उत्तम वस्तुपाठ विलास राजे यांच्या विविध पुस्तकांच्या माध्यमातून प्रदर्शित होतो. वैचारिक आणि ललितलेखनाचा योग्य समन्वय राजे यांनी साधून लेखनातील आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. अर्थात कोणताही साहित्यिक-कलावंत हा परिपूर्ण नसतो. आपल्या निर्मितीत जे न्यून राहते त्याच्या असमाधानातून प्रतिभावंत हे नवनिर्मितीचा ध्यास घेतात.

विलास राजे यांची झिपरी ही कादंबरी एखाद्या वेगवान चित्रपटाप्रमाणे उलगडत जाते. त्यात नायिकेची मानसिकता अजून नेमकेपणाने यायला हवी होती. कथाकलश या संग्रहातील कथा अनुभव विश्वावर बेतलेल्या आहेत; परंतु काही कथा ह्या कथालेख या स्वरूपाच्या वाटतात. प्रजापती कुंभार या पुस्तकातून जातवास्तव कलात्मकतेने मांडले आहे. असे घडले पुणे या पुस्तकाद्वारे अनावश्‍यक भाष्य न करता इतिहासाचे सुबोध कथन केले आहे.

डॉ.नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले की, आताच्या काळात जात आणि धर्म माणसा-माणसांमध्ये अंतर निर्माण करत असताना विलास राजे माणुसकीची मूल्ये आपल्या लेखनाद्वारे रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत, ही आश्वासक गोष्ट आहे. मध्ययुगात ग्रामीण भागात जातनिहाय अर्थव्यवस्था आणि जगण्याचे नियम ठरलेले होते. भावनेच्या आहारी न जाता किंवा कोणाचाही उपमर्द न करता मार्मिक लेखन करणे हे विलास राजे यांचे लेखन वैशिष्ट्‌य आहे.

कृष्णकांत ढाणे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाशक नितीन हिरवे यांनी काव्यात्मक मनोगत मांडले. प्रकाशन सोहळ्यापूर्वी कवयित्री मानसी चिटणीस यांनी विलास राजे यांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांची साहित्यिक वाटचाल श्रोत्यांसमोर आणली. उर्मिला राजे यांनी विलास राजे यांच्या पुस्तकांमधील कविता, पोवाडा आणि निवडक उताऱ्यांचे वाचन केले.

विलास राजे मित्रपरिवार, कुंभश्री मित्रपरिवार, साहित्य संवर्धन समिती, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, शब्दधन काव्यमंच, स्वयंसिद्धा प्रतिष्ठान आणि प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. सविता इंगळे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)