लॅपटॉप, स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मुलांवर दुष्परिणाम

डॉ. राजेंद्र कुंभार ः पालकाने मुलाच्या वाचनातील रोल मॉडेल व्हावे
मंचर  -मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात राहणे ही काळाची गरज असली तरी मोबाईलचा अतिरेक टाळावा. पूर्वी खारीक खोबरे किंवा चौकस आहार म्हणून मुलांना दिला जायचा; परंतु आजच्या युगात स्मार्ट फोनमध्ये एक जीबी डाटासारखा खुराक दिला जातो, ही चिंतेची बाब आहे. मुलांना ग्रंथालयाकडे वळविताना पालकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. लॅपटॉपची स्क्रीन व स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मुलांवर दुष्परिणाम होत आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या वाचनातील रोल मॉडेल व्हायला पाहिजे, असे मत माहितीशास्त्रप्रमुख डॉ. राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केले.
ग्रंथालय शास्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने आयोजित ‘शाळा दत्तक उपक्रम’ शिबीराचे उद्‌घाटन पुणे विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक व शाळा दत्तक उपक्रमाचे (सोलापूर पॅटर्न) जनक दत्तात्रेय क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथमित्र धोंडिबा सुतारगुरुजी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सार्वजनिक ग्रंथालयांनी आपली कार्यक्षमता वाढवून समाजाप्रती असलेले आपले दायित्त्व पूर्ण करावे, तरच समाज आपली दखल घेईल. “या शाळा दत्तक उपक्रमाद्वारे पुणे विभागातील सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून शाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस पुणे विभागाचे सहायक संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी उज्वला लोंढे म्हणाल्या, “येत्या तीन महिन्यात पुणे जिल्ह्यातील 100 टक्‍के ग्रंथालयांना या उपक्रमात सहभागी करून ‘शाळा दत्तक उपक्रम’ यशस्वी करू, ” अशी अशा व्यक्त केली. यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह ग्रंथमित्र सोपानराव पवार, विभाग संघाचे सदस्य ग्रंथमित्र रमेशराव सुतार यांची भाषणे झाली. विभाग संघ कार्योपाध्यक्ष मोहन शिंदे, राजेंद्र ढमाले, विलास चोंधे, जयसिंगशेठ वाघचौरे, दत्तात्रय कड, धोंडीबा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. दिलीप भिकोले यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)