लुका मॉड्रीच सर्वोत्तम खेळाडू ; फुटबॉल मधील मेस्सी, रोनाल्डोची मक्तेदारी संपुष्टात

पॅरिस: क्रोएशियाला विश्‍वचषकाची अंतिम फेरी गाठुन देणारा आणि रियाल माद्रिद क्‍लबला चॅम्पियन्स लीगचे सलग तिसरे विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लुका मॉड्रीचने फुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा “बॅलोन डी ओर’ पुरस्कार जिंकला आहे. मागील दहा वर्षांपासून या पुरस्कार सोहळ्यात लियोनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचा दबदबा राहिला होता. पॅरिस येथे झालेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात त्याला हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आल. तर नॉर्वे आणि लायोन क्‍लबची ऍडा हिगेर्बर्ग महिलांच्या पहिल्यावहिल्या बॅलोन डी ओर पुरस्काराची मानकरी ठरली.

बॅलोन डी ओर पुरस्काराच्या शर्यतीत पोर्तुगाल आणि ज्युव्हेंटस क्‍लबचा रोनाल्डो दुसऱ्या स्थानी, फ्रान्स आणि अटलेटिको माद्रिद क्‍लबचा अँटिनियो ग्रीझमन तिसऱ्या स्थानी, फ्रान्स आणि पॅरिस सेंट जर्मन संघाचा किशोरवयीन खेळाडू कायलीन एमबाप्पे चौथ्या स्थानी राहिला तर अर्जेन्टिना आणि बार्सिलोना क्‍लबचा लियोनेल मेस्सी पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या पुरस्कारासाठी निवडक पत्रकार, राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांना मतदानाचा हक्‍क असतो. त्यांच्या मतदानातून या विजेत्यांची निवड होते.

या वर्षीच्या फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवणारा मॉड्रीच या पुरस्काराचा विजेता ठरेल असे अनेक जाणकार भाकीत करत होते. हा पुरस्कार जिंकल्यावर मॉड्रीच म्हणाला, रोनाल्डो आणि मेस्सीच्या दबदब्यामुळे ज्याकाही खेळाडूंना हा पुरस्कार प्राप्त करता आला नाही त्या सर्व खेळाडूंना हा पुरस्कार समर्पीत करतो. कायलीन एमबाप्पे, अँटोनियो ग्रीझमन सारखे विश्‍वविजेते खेळाडू या पुरस्काराच्या शर्यतीत असूनही मला हा पुरस्कार मिळाला त्यामुळे मी खूप आनंदी असून स्वतःला भाग्यशाली समजतो. मी लहानपणी एखाद्या मोठ्या क्‍लबसाठी खेळता यावे हे स्वप्न पाहायचो. त्यामुळे “बॅलोन डी ओर’ हा माझ्यासाठी फक्त पुरस्कार नसून माझ्यासाठी ही एक अभिमानाची बाब आहे.
“बॅलोन डी ओर’ पुरस्काराच्या शर्यतीत अंतिम 30 खेळाडूंच्या यादीत रोनाल्डो आणि मेस्सी होते परंतु, तब्बल दहा वर्षे या पुरस्कार सोहळ्यावर राज्य करणाऱ्या या दोन खेळाडूंची मक्तेदारी अखेर संपुष्टात आले आहे. 2007 मध्ये ब्राझीलच्या काकाने हा पुरस्कार पटकाविला होता त्यानंतर मेस्सी – रोनाल्डो यांनी अन्य खेळाडूंना हा पुरस्कार जिंकू दिला नव्हता. मागील दहा वर्षात यादोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी पाचवेळा हा पुरस्कार पटकाविला होता.

विस्थापित ते विश्‍वचषक कर्णधार

वयाच्या अवघ्या सहा वर्षांचा असताना बाल्कन युद्धात सर्बियामध्ये मध्ये त्याने आजोबाला गमावले. स्थानिक अतिरेक्‍यांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर मॉड्रीचला आपला देश सोडून दुसरीकडे विस्थापित व्हावे लागले होते. विस्थापीत झाल्याने त्याचे आई-वडील दोघेही एका कापडयाच्या कारखान्यात काम करू लागले. परंतु, मुलाच्या फुटबॉल खेळण्याच्या वेडाला त्याने पाठबळ पुरविले. वयाच्या दहाव्या वर्षी शरिराने लहान आणि ताकदीने कमी असल्याने अनेक फुटबॉल प्रशिक्षकांनी मॉड्रीचला संघात घेण्यास नकार दिला. त्याच्या खेळाणे प्रभावित झालेल्या एका प्रशिक्षकांनी त्याला दिनामो झिबर्ग संघासाठी निवड चाचणीसाठी पाठविले. त्यांनतर मात्र त्याने मागे वळून पहिले नाही.

टोटीन्हम हॉटस्पुर्स आणि नंतर रियाल माद्रिदसाठी तो खेळू लागला. रशिया येथे 2018 साली झालेल्या विश्‍वचषकात अर्जेंटिना संघाला पराभूत करून क्रोएशियाचा संघ इतिहास घडविणार याची चुणूक दिसली होती. त्यानंतर क्रोएशियाने अंतिम फेरीत मजल मारली. परंतु, अंतिम सामन्यात फ्रान्स विरुद्ध त्यांना 4-2 ने पराभूत व्हावे लागले. ऐतिहासीक कामगिरी करण्यात कमी पडल्यावर पारितोषक वितरणाच्या वेळी क्रोएशियन राष्ट्राध्यक्षा कोलिंडा ग्राबर कितारोव यांच्यासमोर तो ढसाढसा रडला. त्याला आवारात कोलिंडा यांनी त्याचे सांत्वन केले होते.

“बॅलोन डी ओर’ विजेते
2008- रोनाल्डो
2009- मेस्सी
2010- मेस्सी
2011- मेस्सी
2012- मेस्सी
2013- रोनाल्डो
2014- रोनाल्डो
2015 – मेस्सी
2016 – रोनाल्डो
2017- रोनाल्डो
2018 – मॉड्रीच

लियोनेल मेस्सी – अनेक जाणकारांच्या मते मेस्सी फुटबॉल विश्‍वातील सार्वकालीन महान खेळाडू आहे. 2006 मध्ये प्रथम मेस्सीने या पुरस्कराच्या यादीत अंतिम तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळविले होते. त्यानंतर 12 वर्षे त्याने पहिल्या तीन खेळाडूंमध्ये राहण्याचा पराक्रम केला. परंतु, 2018 मध्ये पहिल्या तीन खेळाडूच्या स्थान मिळवण्यात त्याला अपयश आले आहे. मेस्सी बॅलोन डी ओर’ प्रथम पाच वेळा जिंकणारा पहिला खेळाडू आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डो – पाच वेळा बॅलोन डी ओर’ पुरस्कार जिंकणारा रोनाल्डो यावेळी देखील पुरस्कार जिंकण्याच्या जवळ होता. मेस्सी – रोनाल्डो कोण श्रेष्ठ? हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वाधिक सहावेळा हा पुरस्कार जिंकून मेस्सीपेक्षा वरचढ ठरण्याची संधी त्याने गमावली आहे. चॅम्पियन्स लीग आणि विश्‍वचषक स्पर्धेत रोनाल्डोने चांगला खेळ केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)