लिव्ह-इनचे कवित्त्व

आजच्या धावत्या युगात जिथे सर्व गोष्टींना पर्याय उपलब्ध आहेत, तिथे भारतीय संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग समजल्या जाणाऱ्या विवाह संस्थेला पर्याय नसेल तरच नवल! हा पर्याय उपलब्ध करून दिलेल्या “लिव्ह इन रिलेशनशिप’ विषयी गेल्या काही काळात अनेक चर्चा रंगल्या. अशीच एक चर्चा नुकतीच फेसबुकवर रंगली. विवाहाला लिव्ह इन रिलेशनशिपचा व्यवहार्य पर्याय! आहे का, यावर मतप्रदर्शन झाले

मुळात, सर्वप्रथम आपण लिव्ह इन’ म्हणजे नक्की काय? आणि या नात्याच्या परिसीमा कोणत्या हे ठरवलं पाहिजे. जेव्हा दोन सज्ञान व्यक्ती एकमेकांवरील प्रेमामुळे विवाहाशिवाय, परस्परांवर कोणत्याही अटी न लादता एकत्र राहतात, तेव्हा त्यांच्या संबंधांना “लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणतात. कोणत्याही अटी न लादताही यातील अधोरेखित बाब. कदाचित म्हणूनच यामध्ये तुमच्या नात्याला शाश्वती नसते. आज जमतंय, आनंदात आहोत तर नातं आहे, उद्या नाही जमलं, कंटाळा आला तर नाही,’ असं मत एका तरुणाने व्यक्त केलं.

काहींच्या मते लिव्ह इनचा उद्देश हा दोघांमधील सुसंगतता तपासून पाहणं, असा असू शकतो. ती मोकळीक असणारी कमिटमेंट वाटते. ते सांगतात, यात तुमच्यावर कायद्याची वा समाजाची कोणतीही बंधनं नसतात, हे जरी खरं असलं तरी आपण जर बेजबाबदारपणे वागलो किंवा आपल्याकडून जराशीही चूक झाली तर आपला साथीदार आपल्याला सोडून जाईल, या भीतीने लोक अधिक जबाबदारीने वागतात आणि म्हणूनच लिव्ह इन’ हे अधिक जबाबदारीचं आणि विश्वासाचं काम आहे. याउलट लग्नामध्ये बेजबाबदारपणा येऊ शकतो. कारण काहीही झालं तरी समोरची व्यक्ती आपल्याला सोडून जाणार नाही, याची खात्री असते, त्यामुळे लोक कसंही वागतात.

लिव्ह-इनचा हा पर्याय स्त्रियांच्या दृष्टीने पोषक असू शकतो. कारण स्त्रीच्या दृष्टिकोनातून लग्न म्हणजे कुटुंबाची जबाबदारी, तडजोड आणि स्वत:चं अस्तित्व हरवण्याची भीती. हे सगळं टाळायचं असल्यास हा पर्याय स्त्रिया आजमावू शकतात. तसंच लिव्ह इन’ म्हणजे स्त्री-पुरुष समानता जपणारी संकल्पना आहे. कारण यात एकत्र राहणाऱ्या व्यक्ती सामंजस्याने आपल्या राहण्याच्या, खाण्याच्या तसंच घरातील इतर खर्चात समान वाटा उचलतात. कुणाचंही कुणावर प्रभुत्व राहत नाही. आणि व्यक्तिस्वातंत्र्यालाही तितकाच वाव मिळतो. मात्र याच व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली काही जण निव्वळ जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवण्यासाठीची पळवाट म्हणून या गोष्टीकडे पाहू शकतात.

लिव्ह इन म्हणजे, जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून, कुठलीही अट न ठेवता, परिपक्वतेने जोडलेलं नातं.’ काहींच्या मते तर, लिव्ह इन ही नोकरीप्रमाणे असते. गुड परफॉर्मन्स इज दी ओन्ली की ऑफ इट, असाही मतप्रवाह दिसला.

वरील बाबींव्यतिरिक्त “लिव्ह इन रिलेशनशिप’ ह्या मुद्दयाला कायद्याचे वलयही आहे. कारण सामान्यत: विवाहित जोडप्याला कायद्याद्वारे मिळणाऱ्या सवलती “लिव्ह इन’मधील जोडप्यांना मिळत नाहीत. अलीकडे मात्र भारतातही यासंदर्भात काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. उदा. ठरावीक कालावधीच्या सहवासानंतर विभक्त झाल्यास स्त्रीला पोटगी मिळणे, अशा संबंधांतून झालेल्या अपत्यांना वारसा हक्क मिळणे इ. तसंच या विषयाचा विचार नैतिकता आणि अनैतिकतेच्या परिघातूनही झाला पाहिजे.

यावर मुळात भारतात नैतिकता आणि अनैतिकता ह्या गोष्टी लैंगिकतेभोवती एकवटल्या आहेत आणि दोन व्यक्ती ठरावीक काळापेक्षा जास्त काळ एकमेकांच्या सहवासात आल्या की, त्यांच्यात शारीरिक संबंध हे निर्माण होणारच, यावर सगळ्यांचं एकमत झालं. कुठलाही नवा विचार हा कालांतराने व्यवस्था बनतो, यावर सर्वांचं एकमत झालं.

– जया शेंबेकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)