लिबर्टीने इनडोअर स्टेडियमचा प्रस्ताव द्यावा

कराड : नरेंद्र सोपल, विजय संतान यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी लिबर्टी मजदूर मंडळाचे पदाधिकारी.

क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल यांचे आवाहन

कराड, दि. 5 (प्रतिनिधी) – लिबर्टी मजदूर मंडळाने इनडोअर स्टेडियम उभा करण्याचा प्रस्ताव द्यावा, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल यांनी केले. तसेच लिबर्टीने प्रस्ताव दिल्यास त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल, अशी हमी त्यांनी दिली.
येथील लिबर्टी मजदूर मंडळाला सहसंचालक नरेंद्र सोपल, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केल्यानंतर मंडळाच्या पदाधिकार्‍यांशी ते बोलत होते.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन क्रीडा धोरणाची माहिती देऊन सोपल म्हणाले, लिबर्टी मंडळाने एक कोटी रुपये खर्चापर्यंतचा इनडोअर स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव दिल्यास शासनस्तरावर सकारात्मक विचार करुन त्याला प्रतिसाद दिला जाईल. नव्या युगात खेळाडूंना असलेल्या संधी जाणून खेळाडूंनी कष्ट घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
लिबर्टी मजदूर मंडळाचे सचिव रमेश जाधव यांनी लिबर्टी मजदूर मंडळाच्या भावी योजना व सध्याच्या कामकाजाबद्दल सविस्तर माहिती दिली. मंडळाच्या नवीन कार्यकारिणीमध्ये तरुण होतकरु संचालक सचिन पाटील, दादासाहेब पाटील, राजेंद्र जाधव तसेच मंडळाचे जुने जाणते संचालक या सर्वांच्या प्रयत्नातून आधुनिक काळातील क्रीडा क्षेत्रासमोरील आव्हाने ताकतीने पेलण्यास लिबर्टी मजदूर मंडळ सज्ज असल्याचे ज्येष्ठ संचालक मानसिंगराव पाटील यांनी सांगितले.
सहसंचालक नरेंद्र सोपल, विजय संतान यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. अशोक चव्हाण, प्रा. बी. के. घाडगे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास मुनीर बागवान, सुभाष डोळ, भास्कर पाटील, काशिनाथ चौगुले, संस्थापक शंकराप्पा संसुद्दी यांच्यासह खेळाडू, क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)