लावणी, गवळण अन्‌ रंगली बतावणी

पिंपरी – महाराष्ट्राचे कला वैभव असणाऱ्या लोककलांचा अविष्कार संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे यांनी सादर केला. गण, गवळण, मर्दानी शाहिरी कवणे आणि बतावणीही रंगतदार झाली. महाराष्ट्रातील लोककला आणि त्यांची वैशिष्ट्ये, ग्रामीण लोकजीवनातील एकरूपता आणि अनुबंधही उलगडला.

मराठी लोककला संमेलनात सकाळी संमेलनाध्यक्षांची प्रकट मुलाखत झाली. प्रसिद्ध निवेदक नाना शिवले यांनी मुलाखत खुलविली. लोकरंगभूमीच्या प्रवासाविषयी देखणे म्हणाले, आजच्या अभिजात रंगभूमीचा जन्म लोकरंगभूमीतून झाला आहे. महाराष्ट्राची प्रत्येक लोककला ही निरूपणप्रधान आहे. निवेदन, निरूपण, संवाद किंवा बतावणी सांगूनच कला सादर केली जाते.

-Ads-

लोकसाहित्याचे विश्व व्यापक आहे. पण या व्यापक विश्वाला पुन्हा एका रंगमंचाच्या विश्वावर उभे करायचे काम लोककलांनी केले आहे. कलावंताची आणि लोककलांची परंपरा अगदी प्राचीन काळापासून प्रवाहीत राहिली आहे. संतांनी महाराष्ट्राला ज्ञानसाक्षर, तर सुधारकांनी बुद्धिसाक्षर आणि लोककलावंतांनी महाराष्ट्राला भावसाक्षर केले. लोककलाकारांना केवळ लोककलाकार म्हणून नव्हे तर लोकसाहित्यकार म्हणून प्रतिष्ठा मिळायला हवी. अशा लोककलांकडे पाहण्याची समाजाची भूमिका बदलायला हवी.

लोकवाद्यांनीही घातली रुंजी
लोककला संमेलनात तालवद्यांची कचेरी झाली. यामध्ये आघाडीच्या कलावंतांनी तालाविष्कार सादर केला. त्यात हार्मोनियमवर संतोष घंटे, प्रसिद्ध ढोलकीवाद राहुल कुलकर्णी, प्रसिद्ध संबळवादक विलास अटक, आश्वासक बासरीवादक अझरुद्दीन शेख, तबला वादक विनायक गुरव, मृदंगवादक सारंग भांडवलकर हे सहभागी झाले होते. वाद्यांचे सत्त्व आणि तत्त्व या कार्यक्रमातून रसिकांसमोर आणण्यात आले. मनात मधुरता निर्माण करणारी आणि रुंजी घालणारी बासरी, कडाडणारी ढोलकी, संबळ, दंग करणारा तबला, मोहिनी घालणारी संवादिनी वादनाने संमेलनात बहार आणली. तीव्र उन्हातही तालवाद्यांच्या स्वरांचा गारवा पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)