लाल, मधुर, रसाळ कलिंगड बाजारात दाखल

मरकळ आठवडे बाजारात खरेदीसाठी गर्दी : एक नग 20 ते 25 रुपयास

चिंबळी- उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण होणाऱ्या नागरिकांना गारेगार कलिंगड थंडावा देणार आहे. आज (मंगळवारी) मरकळ येथील आठवडे बाजारात कलिंगडांची मोठी आवक झाली असून ग्राहकांनी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, उन्हाची तीव्रता आणखी वाढत जाणार असून त्यावर मात करण्यासाठी कलिंगडाची गोडीही वाढणार असून आजच्या बाजारात एक नग 20 ते 25 रुपयाप्रमाणे विकण्यात आले.
उन्हाळ्याची सुरुवात झाली की, मधुर गारवा देणाऱ्या कलिंगडाची लगेच आठवण येते. त्यातच आज मरकळ येथील आठवडे बाजारात कलिंगडाच्या राशी सजल्या होत्या. कलिंगड वेलवर्गीय पीक असल्याने हे पीक विशेषत: नदीपात्रात घेतले जाते; तर काही शेतकरी कालव्याकाठच्या शेतजमिनीतही या पिकाची लागवड करतात. आजच्या काळात भरघोस पीक घेता यावे, याकरिता सुधारित शेतीच्या अनुषंगाने हायब्रीड जातीच्या बियाण्यांची पेरणी केली जाते. त्यामुळे आता बाजारपेठेत बाराही महिने कलिंगड उपलब्ध असतात. मात्र, उन्हाळ्यात मिळणाऱ्या कलिंगडाची मजा काही औरच असते. उन्हाळ्यात रखरखत्या उन्हाच्या पाऱ्याने जिवाची होणारी काहिली कलिंगड व डांगरच दूर करण्यात मदत करतात. वरून हिरवेगार, आत लाल व रसाळ असल्याने बच्चे कंपनीसुद्धा या फळांना आवडीने खातात. त्यातच या फळाचे शरीराला अनेक फायदे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरून प्रवास करून आल्यानंतर कलिंगड खाल्ल्‌याने अंगातली दाहकता कमी होते. पाण्याचे प्रमाण या फळात अधिक मात्रेत असल्याने व समप्रमाणात ग्लुकोजची मात्रा असल्याने शरीरात थंडावा निर्माण करते. तसेच पोटॅशियमचीही मात्रा या फळात असून शरीरातील रक्‍ताची घनआम्लता समप्रमाणात ठेवण्यास मदत होते.
दरम्यान, मरकळच्या आजच्या या बाजारात फ्लॉवर, कोबीसह कलिगंडाची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. मरकळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावठाण परिसरात पूर्वीपासून दर मंगळवारी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत भाजीपाला, कडधान्ये, किराणा वस्तू, कपडे, खेळणी असे विविध प्रकारच्या वस्तू खरेदी व विक्रीसाठी शेलगाव, वडगाव, कोयाळी, तुळापूर, गोलेगाव, सोळू, धानोरे परिसरातील शेतकरी वर्ग व्यापारी येथे माल खरेदी व विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. याद्वारे मरकळ ग्रामपंचायतीला दर मंगळवारी सात ते आठ हजार रुपये उत्पन्न मिळत असते.

  • शेतकरी चिंतातूर
    मरकळ बाजारात आज बाजारात कोबी व फ्लॉवर 15 ते 20 रूपये किलो, कांदा 10 रूपये किलो, हरभरा जुडी 5 तर कोथिंबिरीचे भाव एक-दोन रूपये झाल्याने शेतकरी वर्गाने खर्च वसुल होत नसल्याने तो चिंतातूर झाला होता.
  • कलिंगडाच्या बियांही बहुगुणी
    कलिंगड ज्याप्रमाणे आरोग्यास उपयुक्‍त आहे, त्याप्रमाणे त्याच्या बियासुद्धा शरीरासाठी तेवढ्याच लाभदायक आहेत. कलिंगडाच्या बियांना वाळविल्यानंतर त्यातील मगज सेवन केल्याने ते धातू पौष्टिक आहेत. असे बहुगुणी कलिंगड आता बाजारात आले असून त्यांची मागणी वाढली आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)