“लालपरी’कडे पाठ अन्‌ खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट

पिंपरी – आरक्षणाला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने वल्लभनगर आगाराने एस. टी. च्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. तर दुसरीकडे रात्रीच्या वेळी धावणाऱ्या खासगी बस सोईच्या ठरत असल्याने प्रवासी खासगी वाहतुकीला प्राधान्य देत आहेत. प्रवाशांची गैरसोय पाहून खासगी वाहनांकडून प्रवाशांची अव्वाच्या-सव्वा प्रवासी भाडे आकारुन लूट करण्यात येत आहे.

राज्यातील विविध भागातून पिंपरी-चिंचवड शहरात नागरिक काम, धंद्याच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. शाळा तसेच चाकरमान्यांना दिवाळीला जोडून सुट्ट्या मिळत असल्याने बहुसंख्य चाकरमानी गावाकडेच दिवाळी साजरी करतात. अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी आली आहे. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगारात प्रवाशांचा एस. टी.ला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. अपेक्षेपेक्षा कमी “बुकींग’ झाल्याने 10 गाड्या आगार प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला. बंद केलेल्या गाड्या आणखी काही दिवस तरी बंदच ठेवण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाविद्यालयीन, शाळकरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने सध्या एस. टी ला प्रतिसाद मिळत नसल्याचे एस. टी. प्रशासनाचे म्हणणे आहे गेल्या वर्षी ऐन दिवाळीत राज्यभरातील एसटी कमरचाऱ्यांनी केलेल्या संपाचा वल्लभनगर आगाराला देखील फटका बसला होता. लाखो रुपयांच्या हक्काच्या महसुलावर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे यावर्षीचे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आगार प्रशासनाने कंबर कसली असताना प्रवाशांनी एस. टी. कडे पाठ फिरविली आहे.

बऱ्याच प्रवाशांना दिवसभर काम करुन रात्रीचा प्रवास करुन गावी जायचे असते. त्यासाठी एस. टी. बस उपलब्ध नसल्याने चाकरमान्यांकडून खासगी बसला प्राधान्य दिले जात आहे. रेल्वेचे आरक्षणही मिळत नसल्याने प्रवाशांना खासगी बसकडे वळावे लागत आहे. नागरिकांची ही गरज ओळखून त्यांना लुटण्याचा उद्योग खासगी ट्रॅव्हल्सकडून सुरु आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसपेक्षा दीडपट भाडे वाढ करण्याची मुभा खासगी वाहनांना आहे. मात्र त्यापेक्षा जास्त भाडेवाढ केली जात आहे. नागरिकांना याबाबत माहिती नसल्याने त्यांची फसवणूक होत आहे. बुकींग मिळविण्यासाठी खासगी ट्रॅव्हल एजंट रस्त्यावरच टेबल टाकून ठाण मांडून आहेत. सायंकाळी नोकरदारांची घरी सुटण्याची वेळ आणि प्रवासी मिळविण्यासाठी चौकाचौकात उभ्या असणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मात्र, वाहतूक पोलीस त्याकडे बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

प्रवाशांची संख्या कमी असल्याने प्रतिसाद न मिळणाऱ्या काही गाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिझेलचा खर्च आणि चालकांचा खर्च सुद्धा मिळत नसल्याने काही दिवस आणखी गाड्या बंदच ठेवण्यात येतील.
– संजय भोसले, एस. टी. आगार प्रमुख, वल्लभनगर.

एस. टी. महामंडळाच्या “बुकींग साईट’ला “एर्रर’ आल्यामुळे दोनदा आरक्षण खिडकीवरुन परत यावे लागले. एस. टी. च्या “बुकींग’साठी कार्यालयीन वेळेतच जावे लागते. दिवाळीसाठी गावाकडे जाणारे विद्यार्थी तसेच नोकरदारांसाठी एस. टी. महामंडळाने “रातराणी’ गाड्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
– महेश कुकडे, अभियांत्रिकीचा विद्यार्थी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)