लायन्स क्‍लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रीक्‍ट 3234 डी च्या वतीने “निर्माल्य दान’ हा उपक्रम

गणपती विसर्जनदिवशी राबविणार उपक्रम

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 31 (प्रतिनिधी) – गणपती विसर्जनादिवशी लायन्स क्‍लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रीक्‍ट 3234 डी च्या वतीने “निर्माल्य दान’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये विसर्जन घाटावर गणपती विसर्जित करण्यासाठी आलेल्या भाविकांकडून निर्माल्य संकलन करण्यात येणार आहे, अशी माहिती लायन्स क्‍लबने पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विजय बढे, संयोजक आनंद आंबेकर, प्रसाद खंडागळे, मुकुंद खैरे, प्रवीण ढोरे उपस्थित होते.

यावर्षीच्या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 5) विसर्जनादिवशी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लायन्स क्‍लबचे प्रांतपाल गिरीश मालपाणी, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपप्रांतपाल रमेश शहा, ओमप्रकाश पेठे हे देखील उपस्थित राहणार आहेत. मागील चौदा वर्षांपासून लायन्स क्‍लबच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नदीपात्रात पडणारे निर्माल्य रोखण्याचे तसेच ते गोळा करून त्याबाबत समाजप्रबोधन करण्याचे कार्य क्‍लबकडून करण्यात येते. यामध्ये पुणे शहरातील 22 तर पिंपरीतील 7 घाटांवर क्‍लबचे पदाधिकारी आणि सभासद निर्माल्य संकलन करतात, दरवरर्षी 40 ते 45 टन इतके निर्माल्य गोळा केले जाते. हे निर्माल्य महानगरपालिकेकडे खतनिर्मितीसाठी दिले जाते. अशी माहिती विजय बढे यांनी दिली.

गणपती विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी त्यांच्याजवळील निर्माल्य पाण्यात न टाकता ते दान कारावे असे आवाहन आनंद आंबेकर यांनी केले. त्यामुळे नदीप्रदुषण होणार नाही, असेही आंबेकर यांनी सांगितले. होळकर घाट, संगम घाट, ओंकारेश्वर घाट, विठ्ठल वाडी घाट, दत्तवाडी घाट, औंध घाट, रहाटणी घाट, चिंचवड मोरया गोसावी घाट, गरवाले पूल, राजाराम पुल, भिडे पूल, वडगाव कॅनॉल, मीरा सोसायटी कॅनॉल, अप्सरा थिएटर कॅनॉल, सारसबाग कॅनॉल, कात्रज तलाव, गणेश तलाव आकुर्डी, तळेगाव याठिकाणी निर्माण दान हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुकुंद खैरे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)