लाड करताना करा विचार…

बालमानसशास्त्राचा विचार केला तर लहान मुले जे मागतील ते पटकन आणून देणं किंवा न मागताच देणं, अति प्रमाणात लाड करणं, शिस्तीचा अभाव असणं, अशा गोष्टींमुळे मुले बिघडतात. प्रसंगी घरातील वडील मंडळींनीही मुलांचे लाड करताना काही भान बाळगणे गरजेचे असते.

चार वर्षांच्या सुजलला घेऊन त्याची आई भेटायला आली. सुजलच्या आईबरोबर तिची एक मैत्रिणदेखील आली होती. याच मैत्रिणीने तिला सुजलला समुपदेशनासाठी घेऊन येण्याबाबत सुचवले होते. त्यामुळे दोघी सुजलला घेऊन आल्या होत्या. सुजलच्या आईने तिची स्वतःची ओळख करून दिली. ती एका कंपनीमध्ये नोकरी करते. घरात आई, वडील, सुजल, त्याची मोठी बहीण व आजी-आजोबा राहतात. गेल्या आठ-दहा महिन्यांत सुजलचं वागणं खूपच बदललंय, हे सांगताना आईला रडू आवरणं कठीण झालं.

आई खूपच अस्वस्थ झाल्याने तिला शांत होण्यासाठी वेळ दिला. या काळात सुजलचं निरीक्षण करताना असं लक्षात आलं की, सुजल अतिशय चिडका आणि तापट आहे. प्रत्येक गोष्ट रडत, ओरडत बोलणं, आईनी ऐकलं नाही तर तिला मारणं, चिमटे काढणं असं वर्तन तो वारंवार करत होता; आणि त्याने तसं करू नये म्हणून, तो सांगेल ती प्रत्येक गोष्ट आई लगेच ऐकत होती. त्याच्या या वर्तनाला आईने एकदाही विरोध केला नाही.

आईचं हे वागणं हेच त्याच्या वर्तनामागचं किंवा समस्येमागचं महत्त्वाचं कारण असाव असं या निरीक्षणावरून वाटलं. म्हणून त्याच्या या वर्तनाला आईला मुद्दामून विरोध करण्यास सांगितले. हा विरोध अनपेक्षित असल्याने त्याने आईला कडाडून विरोध केला. परंतु तरीही आई मात्र त्याला काहीच बोलली नाही.

सुजलची आई शांत झाल्यावर तिची मैत्रिण सुजलला घेऊन बाहेर गेली आणि मग तिच्याशी सविस्तर बोलायला सुरुवात केली, तेव्हा सुजलच्या समस्येमागचं मूळ कारण लक्षात यायला लागलं.

सुजलच्या आई-वडिलांचं लग्न झाल्यानंतर बऱ्याच प्रयत्नांनी व बऱ्याच उशिरा त्यांना मूल झालं. त्यामुळे अर्थातच सगळेच जण मुलीचे आणि मुलीचे आणि मुलाचे म्हणजे या दोन्ही भावंडांचे खूप लाड करायचे. ते म्हणतील ते आणि म्हणतील तेव्हा त्यांच्यासमोर हजर करायचे. अनेक गोष्टी तर गरज नसतानाही त्यांना आणून दिल्या जायच्या.

आईच्या हे लक्षात आल्यावर आई मुलांना रागवायची; पण बाकीच्यांचा मात्र याला विरोध असायचा. आईने त्यांना रागावता कामा नये. असं घरातल्या प्रत्येकाचं म्हणणं असायचं. आई मुलांना रागावली की आजी-आजोबा तिलाच रागवायचे. मुलीचा स्वभाव मुळातच शांत असल्याने तिने आईला फारसा त्रास दिला नाही. पण सुजलचा स्वभाव या अतिलाडापायी हट्टी, चिडका आणि दुराग्रही बनला. इतरांचं अनुकरण करत तो देखील आईसमोर आरडाओरडा करणं, वस्तू फेकणं असं वर्तन करायला लागला. सुरुवातीला आईने शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. पण घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तिनेही नाईलाजाने हा प्रयत्न सोडून दिला.

आणि या साऱ्याचा व्हायचा तोच परिणाम सुजलवर झाला. तो जास्तच हट्टी आणि चिडखोर बनत गेला. कोणाला ऐकेनासा झाला. आजी-आजोबा, आई, बाबा कोणालाही मारणं, चावणं, वस्तू फेकणं असं आक्रस्ताळं वर्तन करायला लागला. त्याची ही समस्या आणि त्याची कारणं लक्षात आल्यावर सुजलच्या आईला त्याचं गांभीर्य लक्षात आणून दिलं आणि सुजलच्या वडिलांना घेऊन दोनच दिवसात पुढील सत्रासाठी घेऊन येण्यास सांगितलं.

आईलाही समस्येचं गांभीर्य लक्षात आल्यामुळे ती दोनच दिवसात सुजलच्या वडिलांना घेऊन परत भेटायला आली. या सत्रात आईला आणि वडिलांना सुजलच्या समस्यांची, कारणांची आणि परिणामांची सखोल जाणीव करून देण्यात आली आणि नंतर उपाय योजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. वडिलांच्या मदतीने सुजलच्या आजी-आजोबांशीदेखील संवाद साधून याबद्दल प्रक्रियेत त्यांना समाविष्ट करून घेतले. काही काही बदल प्रयत्नपूर्वक करण्यास सांगितले. त्यासाठी मानसोपचारातील काही वर्तन बदल तंत्रांचाही वापर केला.

या साऱ्या प्रयत्नांमुळे आणि मुख्य म्हणजे सर्वांच्या वर्तनात शिस्त लावण्यात एकवाक्‍यता, सुसूत्रता आल्याने सुजलच्या सगळ्या वर्तन समस्या हळूहळू कमी होत गेल्या आणि घरातलं वातावरणही सुधारत गेलं. कळत-नकळत घरातील सदस्यांमधील नातेसंबंध सुधारायलाही मदत झाली होती.
(केसमधील नाव बदलले आहे.)

मानसी चांदोरीकर, समुपदेशक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)