लाचखोरी कारवाई “अपडेट’साठी व्हॉटस्‌ ऍप ग्रूप

जिल्ह्यातील तलाठी एकवटले : कारवाई होताच एकमेकांना “ऍलर्ट’


लाचही मागणार, खबरदारी घेण्याचेही प्रयत्न

 

पुणे – ऍन्टी करप्शन सापळ्यात महसूल कर्मचारी सर्वाधिक सापडतात. यातही तलाठ्यांची संख्या जास्त आहे. कारवाईपासून वाचण्यासाठी जिल्ह्यातील तलाठ्यांनी चक्क व्हॉटस्‌ अप ग्रूप तयार केला आहे. यामध्ये एखाद्या तलाठ्यावर कारवाई झाल्यास त्याची माहिती ग्रूपवर दिली जाते. त्यातून इतर तलाठी सतर्क होतील. इतकेच नव्हे, तर लाच घेताना कोणती खबरदारी घ्यावी याची माहितीही ते एकमेकांना “शेअर’ करत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सूत्रांनी दिली. “लाच तर मागायचीच, मात्र ती घेताना पकडले जाणार नाही याची खबरदारी घ्यायची’ असे प्रयत्न तलाठ्यांकडून होत आहेत.

सरकारी बाबूंनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचा धसका घेतला आहे. जनजागृती तसेच ई-मेल, व्हॉटस्‌ ऍप फेसबुक आणि वेबसाइटव्दारे तक्रारी घेणे सुरू केल्याने कारवाईचा फास चांगला आवळला जात आहे. मात्र, असे असतानाही सरकारी बाबुंची पैसे स्वीकारण्याची लालूच कमी झालेली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी हे सरकारी बाबू विविध प्रकारच्या क्‍लुप्त्या लढवत आहेत.
लाचेची तक्रार प्राप्त झाली, तरी अनेकदा आरोपी कारवाईच्या सापळ्यात सापडत नाही. मागील अडीच महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एका तलाठ्यावर लक्ष ठेऊन आहे. मात्र, तो फिर्यादीलाच गुंगारा देत आहे. त्याला विविध ठिकाणी, विविध हॉटेलांत पैसे घेऊन बोलावले जाते. मात्र प्रत्यक्षात संबंधित तलाठी पैसे स्वीकारण्यास येत नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भीती आहेच, मात्र हाताची खाजही मिटवायची आहे अशा व्दिधा मनस्थितीत सरकारी बाबू सापडले आहेत.

* सुट्टी नसते बरं का…

लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही हुलकावणी देण्याचा प्रयत्न अनेक लाचखोर करताना दिसतात. मात्र, असे धुरंदरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकतात. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एका महिला अधिकाऱ्याने लाच घेण्यासाठी सरकारी सुट्टीची निवड केली. दुसऱ्या शनिवारी सरकारी सुट्टी असल्याने तिने फिर्यादीला शनिवारीच पैसे घेऊन बोलावले होते. तिला वाटले इतर सरकारी कार्यालयाप्रमाणेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही सुट्टी असेल. मात्र, तसे न होता तिच्यावर सरकारी सुटीदिवशीही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक सुट्टी असली, तरी लाचलुचपत प्रतिबंध विभाग कारवाई करू शकतो, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले.

पुणे जिल्ह्यात सन 2017 मध्ये महसूल विभागातील 33 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 10 तलाठी, 6 ग्रामसेवक यांचा समावेश होता. लाचखोरी रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन तक्रार द्यावी.
– जगदीश सातव, पोलीस उपाधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)