लाचखोरीचा पुण्याला “कॅन्सर’

..तक्रारदारांची कामे मार्गी लावण्यात पुढाकार
“लाच मागितल्याची तक्रार दाखल केल्यानंतर आपली कामे होणार नाहीत’ अशी भीती संबधित तक्रारदारांना वाटत होती. त्याची गंभीर दखल घेऊन संबधित तक्रारदारांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कामे करुन देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ही घोषणाच करुन न थांबता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी केली असून नागरिकांना ही कामे करुन दिली आहेत. त्यामुळे अनेक प्रकरणे पुढे सरकली आहेत.

2 हजार 300 वर अधिकारी अडकले सापळ्यात
पुणे विभागात सांगली दुसऱ्या क्रमांकावर

पुणे – विविध कामे करताना सरकारी आणि निमसरकारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी हात धुऊन घेत “लाचखोरीचा पराक्रम’ केल्याची प्रकरणे वाढली आहेत. नागरिकांची विविध कामे करुन देण्यासाठी या अधिकाऱ्यांचा टक्का चांगलाच वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत 2 हजार 300 हून जास्त अधिकारी ऍन्टी करप्शनच्या लावलेल्या सापळ्यात अडकले आहेत. विशेष म्हणजे, या लाचखोरीत पुणे विभागातील पुणे शहर आणि जिल्हाच आघाडीवर राहिला असून सांगली जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

असा वाढला लाचखोरांचा टक्का…!
जिल्हा वर्ष 2015 वर्ष 2016 वर्ष 2017
पुणे 1100 737 424
सातारा 102 98 69
सांगली 64 107 50
सोलापूर 31 28 10
कोल्हापूर 49 10 18

एकूण 1346 980 571

-Ads-

“लाच घेतल्याशिवाय नागरिकांची कामे करायची नाहीत’ असा नियम लावण्यात काही शासकीय तसेच निमशासकीय अधिकाऱ्यांचा हातखंडा आहे. तर आपली कामे जलद करुन घेण्यासाठी नागरिकही लाच देण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळेच या सरकारी बाबूंना कशाचीही भीती राहिलेली नाही. मात्र, त्याचा त्रास प्रामाणिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग युध्दपातळीवर प्रयत्न करत असताना त्यांना कारवाई करण्यात यशही आले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून लाच मागणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारी देण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रयत्न करण्यास सुरूवात केली.त्यासाठी सोशल मीडिया, जाहिराती आणि अन्य माध्यमांतून गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्यामुळेच लाचखोर अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्याची नागरिकांची मानसिकता वाढली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रसाद हसबनीस यांनी “प्रभात’ शी बोलताना दिली.

लाच देणे अथवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. लाचखोरांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे. त्याशिवाय भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट होणार नाही. त्यासाठी नागरिकांची मानसिकता बदलण्याची आवश्‍यकता असून त्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
– प्रसाद हसबनीस, सहाय्यक पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)