लाखोंची नोकरी सोडून घेतला फूलशेतीचा वसा

     प्रेरणा

  दत्तात्रय आंबुलकर

तो कल्पक होता, काहीतरी वेगळे, नवीन करण्याचा त्याने जणू ध्यासच घेतला होता. त्याचसाठी आपल्या भव्य-दिव्य स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी तब्बल 50 लाखांच्या नोकरीवर पाणी सोडण्याची तयारी त्याने दाखविली. त्याच्या ध्येयाला सृजनशील इच्छाशक्‍तीचे पंख लाभले. त्याने यशाची उत्तुंग झेप घेतली आणि आज तो तब्बल एक कोटींचा आर्थिक नफा कमवीत आहे.

ही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्‍ती म्हणजे इंदोर येथे कधी बॅंकिंग क्षेत्रात कार्यरत असणारे विनय शर्मा! बॅंकेत उच्च व्यवस्थापकीय पदावर असणाऱ्या विनय शर्मा यांनी तब्बल 50 लाखांचे वार्षिक पगार-पॅकेज सोडून फूलशेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि प्रतिकूल परिस्थितीतही नफा कमविता येतो, हे सिद्ध करून दाखविले. जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्‍ती हे सारे एकवटल्यास, काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंदोर-उज्जैन मार्गावर सांवेरजवळील पंथपिपलाई परिसरातील चार एकर जागेवर विनय शर्मांनी साकारलेली फूलशेती.

बॅंकेच्या वातानुकूलित केबिनमधून शेतीच्या उघड्या माळरानावर काळ्या मातीत उतरण्याचा शर्मा यांचा प्रवास उत्साहवर्धक व प्रेरणादायी असाच राहिला. आपल्या बॅंकिंग नोकरीच्या दरम्यान एक दिवस कर्जासंबंधी एक फाईलमध्ये विनय शर्मा यांनी एका व्यापाऱ्याने तब्बल सहा कोटी रुपयांची फुले खरेदी केल्याची नोंद पाहिली व ते पाहून शर्मा थक्‍कच झाले. फूल व्यापारात ही उलाढाल प्रचंड होती.

त्यानंतर विनय शर्मा यांनी इंदोरचा फूल बाजार पालथा घातला आणि “त्या’ व्यापाऱ्याची माहिती पडताळून पाहिली, तेव्हा त्यांना आश्‍चर्याचे अनेक धक्‍के बसले. त्यातून फुलांच्या क्षेत्रात विशेषतः बारमाही मागणी असून त्यात नफाही प्रचंड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इंदोरच्या विवाह-समारंभ कालावधीत प्रत्येक विवाहप्रसंगी लाखांवर रुपयांची फूल खरेदी-सजावट केली जाते. ही फुले मुख्यतः मलेशिया-सिंगापूर, बंगलोर, देहराडून, नाशिक-पुणे इ. ठिकाणाहून इंदोरला दररोज येतात अशी माहिती शर्मा यांना मिळाली व यातूनच विनय शर्मांच्या विचारांना व्यावसायिक प्रयत्नशीलतेची कलाटणी पण मिळाली.

इंदोरला बाहेरून व विदेशातून पण फुले येतात. तर आपणच त्याचे उत्पादन का करू नये, असा विचार त्यांनी केला व बॅंकेची वार्षिक 50 लाख रुपयांची नोकरी सोडून फुलांची फूलशेती करण्याचे प्रयत्न सुरू केले. कुठलाही पूर्वानुभव नसला तरी जिद्दीने व नवनिर्मितीच्या ध्यासासह असणाऱ्या त्यांच्या या प्रयत्नांना अल्पावधीतच व अपेक्षित फळ लाभले. विनय शर्मांनी बॅंकेची नोकरी सोडून पॉलिहाऊसमध्ये फुलांची व भाज्यांची शेती सुरू केली. या ध्येयाला सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड दिली व त्यांनी आपल्या चार एकरातून फूलशेतीद्वारा वार्षिक 1 कोटी रुपयांची उद्दिष्टपूर्ती पण केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)