लाखोंचा दंडकरूनही माती, मुरुम उत्खनन सुरूच

पाईट – “भय इथले संपत नाही’ असे म्हणण्याची वेळ खेड तालुक्‍यातील आदिवासी भागातील जनतेवर आली आहे. पावसाळा संपतो ना संपतो लगेच हे लॅंडमाफिया गौण खनिजांचे उत्खनन करण्यास सुरुवात करतात, यावर्षी विक्रमी असा 61 लाख रुपये दंड स्वरूपात वसूल केला असला, तरी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे उत्खनन करून लॅंडमाफिया चोरट्या पद्धतीने माती व मुरूम यांची खुलेआम चोरी करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहेत.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी आयुष प्रसाद व तहसीलदार सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार राजेश कानसकर यांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. तलाठी मंडलाधिकारी यांचे सजा नुसार वेगवेगळे ग्रुप बनवून लॅन्डमाफियांवर बेधडक कारवाई करून त्यांच्या मुसक्‍या आवळल्या या लॅन्डमाफियांवर कारवाई करीत 61 लाख रुपये इतका महसूल दंड रूपाने वसूल केला आहे. मात्र, तरीही खेड तालुक्‍यातील पश्‍चिमेला असलेला आदिवासी भाग या माफियांच्या अवैध धंद्यामुळे विद्रुप बनु लागला आहे. ते उत्खनन करताना अनेक वृक्ष-वेलींची खुलेआम तोड केली जात आहे. यावर महसूल विभाग कारवाई करीत आहेत; परंतु उत्खननाच्या ठिकाणी होणाऱ्या वृक्षतोडीवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे.
दरम्यान, ज्या व्यावसायिकांनी शासनाच्या नियमानुसार रॉयल्टी भरली आहे, त्यांनी वाहनांमधील माती झाकणे गरजेचे आहे. कारण वाहने रस्त्यावरून जात असताना मातीचे कण सतत उडत असतात यामुळे मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यात मातीच लहान खडे व धूलिकण गेल्याने डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत. तर सततच्या होणाऱ्या माती उपशाने या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. लहान मुलांबरोबरच नागरिकांना श्‍वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. तर सतत वाहनांची तसेच जेसीबी चालू असल्याने सतत कर्णकर्कश आवाज येत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे, तर काही नागरिक निद्रानाशाच्या आजाराला बळी पडले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे, तर रस्त्यांच्या कडेच्या घरांमध्ये धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.चौकट : …तर शेतकऱ्यांच्या जमिनींवर लाखोंचा दंड
इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये रॉयल्टी मिळत नसल्याने या विभागातील माती उत्खनन करणे धोक्‍याचे झाले असल्याने या माफियांनी इको सेन्सिटिव्ह झोन विरहित असलेल्या भागात 300 ब्रासची रॉयल्टी काढतात आणि हजारो ब्रासच्या माती व मुरूम यांचे उत्खनन केले जाते, यामूळे लाखो रुपयांचा महसूल बुडवला जातो. महसूल विभागाकडून चोऱ्या करणाऱ्या माफियांच्या गाड्यांवर हजारात दंड वसूल केला तर शेतकऱ्यांच्या जमिनीवर लाखो-करोडो रुपयांचा दंड ठोठावला जातो याचे आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)