रेडा- इंदापूर तालुक्‍यातील लाखेवाडी गावच्या हद्दीतील 250 कुटुंबीयांना घरकुल मंजूर होऊन 30 वर्षांचा कालावधी उलटून गेला असून ते याच घरकुलांमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र, ही जागा वनखात्याची असल्याने आता या नागरिकांना शासनाकडून नोटीस जात आहे. अतिशय गरीब परिस्थितीतील ही कुटुंबे आहेत, यावर तोडगा काढावा, अशी मागणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत विषेश बैठक घेतली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी इंदापूर तालुक्‍यातील विविध प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी हेका धरला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बारामती लोकसभा मतदार संघातील लाखेवाडी हे गाव असून, उपेक्षित व गरीब कुटुंबातील नागरिक याठिकाणी घरकुल योजनेतून उभारलेल्या घरात राहतात. एकीकडे पाऊस नाही, शासनाची धोरणे उभारी देणारी नाहीत, तर दुसरीकडे निवासी घरकुल हे वन विभागाच्या हद्दीत आहे म्हणून घरे सोडण्याच्या नोटीसा धाडल्या जातात, त्यामुळे या गावातील नागरिकांचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावर कायम स्वरुपी तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.
इंदापूर तालुक्‍यातील पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे नीरा उजवा कालवा तसेच खडकवासला कालव्यामधून पाझर तलाव भरावे, अशी मागणी त्यांनी केल्यानंतर पुढील 8 दिवसांमध्ये पाणी सोडण्याचे आश्‍वासन पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंतांनी दिले. तसेच कुंभारगाव येथे सबस्टेशन करिता निधी मंजूर झाला आहे; परंतु त्यासाठीची जागा वनखात्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून जागा मंजूर करून द्यावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)