लाखणगाव-काठापूरचे बंधारे कोरडेठाक

लाखणगाव- लाखणगाव-काठापूर (ता.आंबेगाव) परिसरातील बंधारे पाण्याअभावी कोरडे पडल्याने शेतीला पाणी उपासणाऱ्या विद्युत मोटारी बंद झाल्या असल्याने पिके जळू लागली असून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे डिंभे धरण हुतात्मा बाबू गेणू सागर येथून पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाने नियोजन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्‍याची जीवनदायिनी असणारी घोडनदी सध्या पाण्याअभावी अनेक ठिकाणी कोरडी पडली आहे. घोडनदीवर असणारे अनेक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याअभावी कोरडे पडल्याने अनेक विद्युत पंप बंद झाले आहेत. त्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी शेती पिके जळू लागली असून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाळा संपला असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले असल्याने पुढील नऊ महिने पाण्याचे नियोजन कसे करायचे हा प्रश्‍न सध्या शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे. घोडनदीवरील काठापूर, लाखणगाव, देवगाव या पूर्वेकडील गावांमधील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपला असून अनेक शेती वीज पंप पाण्याअभावी बंद पडले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असून ऊस, तरकारी पिके आणि जनावरांची चारा पिके पाण्याअभावी उभी पिके डोळ्यादेखत जळू लागली असूनही शेतकरी काहीही करू शकत नसल्याने तो हवालदिल झाला असल्याने डिंभे धरण हुतात्मा बाबू गेणू सागर येथून पाणी सोडावे, अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.

  • विहिरींच्या पातळीत मोठी घट
    जर घोडनदीला पाणी आले नाही तर पिके जळून जातील आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. पावसाने दडी मारल्याने चांगला पाऊस आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात झालाच नाही. परिणामी विहिरींच्या पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणावर घट झाली असून जमिनीतील पाणीसाठा ही कमी झाला आहे. तर पिकांना नदीद्वारे होणारा पुरवठाही पाण्याअभावी होत नसल्याने पिके जळू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)