‘लाईट हाऊस’ने आयुष्यात ‘प्रकाशवाटा’

सुनील राऊत

1,700 जणांना रोजगाराची दिशा: महापालिका, स्मार्ट सिटीचा उपक्रम

पुणे – “रोजगाराची संधी हवी, पण प्रशिक्षण नाही’, “प्रशिक्षण घ्यायचंय, पण पैसा नाही…’ म्हणून अनेकदा वस्तीपातळीवरील आणि आर्थिक दुर्बल घटकांमधील युवक गुन्हेगारीकडे वळतात. मात्र, त्यांना रोजगार प्रशिक्षण आणि जोडीला स्वत:च्या आवडीच्या कामासाठी संधी दिल्यास या शक्तीचा सकारात्मक उपयोग करता येतो. हे स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेच्या “लाईट हाऊस’ या अनोख्या उपक्रमाने सिध्द करून दाखविले आहे. यामुळे तब्बल 1,700 युवकांना गेल्या दोन वर्षांत रोजगाराची संधी मिळाली असून अनेकांनी स्वत:चा व्यवसायदेखील सुरू केला आहे.

काय आहे “लाईट हाऊस’ प्रकल्प?
देशातील वेगाने वाढते महानगर म्हणून पुणे उदयास येत आहे. शहरात सुमारे 42 टक्के नागरिक हे वस्त्या आणि झोपडपट्ट्यांत. स्वत:ला सिध्द करण्याची क्षमता आणि आकांक्षा बाळगणाऱ्यां या युवाशक्तीला घरातील हालाखीची आर्थिक स्थिती आणि रोजगारासाठी आवश्‍यक असलेले प्रशिक्षण घेता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन पुणे महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत “पुणे सिटी कनेक्‍ट’ या संस्थेच्या मदतीने “लाईट हाऊस; कौशल्य विकास व रोजगार केंद्र’ हा उपक्रम 16 जून 2016 रोजी सुरू केला.

असे आहे प्रशिक्षणाचे स्वरूप
शहरात सुमारे 3 ठिकाणी हे केंद्र सुरू असून या केंद्रात 18 वर्षे वय पूर्ण असलेल्या युवक युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील 20 हून अधिक प्रशिक्षण कोर्स या केंद्रात चालविले जातात. प्रामुख्याने वस्तीमधील व आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांनाच प्रवेश दिला जातो. सुरूवातीला 20 दिवस प्रशिक्षणार्थींना व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर आवड, क्षमता आणि गुणवत्ता याची चाचपणी करून विद्यार्थ्यांची करिअर टेस्ट घेतली जाते. त्यानंतर विद्यार्थी आपल्या आवडीच्या विषयाचे प्रशिक्षण घेतो आणि तो यशस्वीपणे पूर्णही करतो. या केंद्रांमध्ये टॅली, कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलरिंग, ब्युटी आणि हेल्थ, जिम इन्स्ट्रक्‍टर, नर्सिंग सहायक, कुकिंग, ग्राफिक डिझायनर, सॉफ्टवेअर लॅन्ग्वेज यासह अनेक कोर्स येथे चालविले जातात.

580 युवक-युवतींना मोठ्या कंपन्यांत “जॉब’
औंध, येरवडा, हडपसर, वारजे येथे हे लाईट हाऊस केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये गेल्या दोन वर्षात तब्बल 3 हजार युवक युवतींना यशस्वीपणे प्रशिक्षण देण्यात अले असून त्यातील तब्बल 1700 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. तर उर्वरीत 1,300 जणांचे वेगवेगळया टप्प्यावर प्रशिक्षण सुरू आहे. यात सुमारे 580 युवक युवती, महिंद्रा, टाटा, ग्लोबल इन्फोसिस, न्यांसा यासह अनेक राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीस आहेत.

आणखी अनेक ठिकाणी केंद्र
तर अनेकांनी स्वतंत्र यवसाय सुरू करून स्वत:सह इतरांना रोजगार संधी उपलब्ध केल्या आहेत. या प्रकल्पांचे यश पाहता शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा निश्‍चितीचे काम सुरू असून येत्या काही वर्षात सर्व ठिकाणीही “लाईट हाऊस’ सुरू होणार आहेत.

इंदिरा वसाहत ते औंध लाईट हाऊस आणि तिथून इन्फोसिसपर्यंतचा माझा प्रवास अनेक नव्या संधी निर्माण करणारा ठरला. या केंद्रात सहभागी झाल्यानंतर मी स्वत:मध्ये खूप बदल केले. या प्रकल्पातील प्रशिक्षणाने माझे संभाषण कौशल्य सुधारले. त्यामुळे मी इन्फोसिसपर्यंत यशस्वी वाटचाल करू शकलो. आपल्या प्रमाणेच वस्तीमधील इतर मुलांनाही या प्रकल्पांपर्यंत आणणे हे माझे ध्येय असणार आहे. – अल्ताफ सय्यद, प्रशिक्षणार्थी, लाईट हाऊस


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)