लांडेवाडीचा संघ फुटबॉल स्पर्धेत अजिंक्‍य

मंचर -आंबेगाव तालुक्‍यातील डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज लांडेवाडी संघाने बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान संघाचा 2-0 ने पराभव करीत अजिंक्‍यपद पटकाविले, अशी माहिती विद्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये दौंड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील वयोगटात एकूण 13 तालुका संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या सुरूवातीला आंबेगाव तालुक्‍याच्या वतीने डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज लांडेवाडी या संघाने भोर येथील संघाचा 2-0 असा पराभव करुन दुसऱ्या फेरीत मजल मारली. दुसऱ्या फेरीत तुल्यबळ अशा जुन्नर तालुकास्तरीय संघाचा पराभव करुन फायनलमध्ये धडक मारली होती. यामध्ये मिलन जॅकब व वेदांत कराळे यांनी प्रत्येकी एक गोल करीत विजयासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. फायनलमध्ये उतरलेला बारामतीचा संघ अतिशय तुल्यबळ होता; परंतु डेक्कन मराठा कॉलेजच्या खेळाडूंनी अतिशय उल्लेखनीय खेळ करत बारामती संघाला 2-0 ने पराभूत करुन अंतिम विजय मिळविला. जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये अजिंक्‍यपद पटकाविल्याने हा संघ आता विभागीय पातळीसाठी पात्र ठरला आहे. डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज लांडेवाडी संघातील खेळाडूंचे सर्व ठिकाणांहून कौतुक होत असून या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे व्यवस्थापिका शामल चौधरी, डेक्कन मराठा कॉलेजचे प्राचार्य कोलते, तसेच न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या शबनम मोमीन यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले. विजयी खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक संभाजी काळे व भरत खिलारी यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)