लांडग्यांच्या हल्ल्यात 23 शेळ्यांचा मृत्यू

सव्वादोन लाखांचे नुकसान 


जखमी सात शेळ्यांची मृत्युशी झुंज


आंबेगाव तालुक्‍यातील तांबडेमळ्यात घडली घटना


 वन अधिकाऱ्यांनी केला घटनेचा पंचनामा

मंचर- लांडग्यांच्या कळपाने शेळ्यांच्या गोठ्यावर हल्ला केल्यामुळे तब्बल 23 शेळ्यांचा मृत्यू झाला. तर सात शेळ्या मृत्युशी झुंज देत आहेत. ही घटना रविवारी (दि. 25) पहाटे 5 वाजता तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे घडली. एकंदर 2 लाख 22 हजार 500 रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

शेतकरी शेतकरी संदीप भोर आणि राजेंद्र वाळके यांनी भागीदारीत बंदिस्त शेळीपालन गोठा केला आहे. आठ गुंठे क्षेत्रात लोखंडी जाळीचे कंपाउंड उभारून 52 शेळ्या, 25 लहान मोठी करडे आहेत. पहाटे पाचच्या सुमारास शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेतकरी संदीप भोर हे शेळ्यांच्या गोठ्याच्या दिशेने पळत आले. त्यावेळी गोठ्यात पाच ते सहा लांडग्यांची शिरलेला कळप शेळ्यांचे लचके तोडताना दिसून आला. शेतकरी संदीप भोर यांनी लांडग्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका लांडग्याने त्यांच्या दिशेने झेप मारून त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रसंगावधान राखत संदीप भोर यांनी फरशीचा तुकडा लांडग्याच्या दिशेने फेकून मारल्याने लांडग्यांची पळापळ झाली.

संदीप भोर यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्याने त्यांच्या मदतीला आई कुसूम, वडील बाबूराव, चुलते विठ्ठल, कामगार अमोल पवार पळत आले. त्यावेळी मात्र लांडग्यांनी पळ काढला. गोठ्यामध्ये पाहणी केली असता 23 शेळ्या गतप्राण झाल्या. तर 7 शेळ्या गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. अनेक शेळ्यांचे कान आणि गळ्याला लांडग्यांची चावा घेतल्याचे दिसून आले. अंदाजे पाच ते सहा लांडगे पूर्ण सशक्‍त वाढ झालेले होते, असे संदीप भोर यांनी सांगितले.

शेळी गोठ्याला बंदिस्त जाळीचे भक्‍कम कंपाउड असतानाही लांडग्याने केलेला हल्ला पाहून येथील शेतकरी धास्तावले आहेत. बंदिस्त शेळी गोठ्याच्या पूर्व बाजुने तारेच्या जाळीला छिद्र पाडून लांडगे आतमध्ये घुसल्याचे दिसून आले. घटनास्थळी वनखात्याचे वनपाल व्ही. आर. वेलकर, वनरक्षक बी. एच. पोत्रे, अवसरी खुर्दचे पशुवैद्यकीय अधिकारी अरूण महांकाळ, सेवानिवृत्त अधिकारी बबन बिडकर यांनी भेट देऊन पाहणी केली. वनखाते आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. अंदाजे एक तासापेक्षा जास्त वेळ लांडग्यांचा धुमाकूळ येथे चालला असावा, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्‍त केला.

बिबट्यासह लांडग्यांचीही दहशत
आंबेगाव तालुक्‍यामध्ये आत्तापर्यंत बिबट्याची दहशत आहेच. पाळीव प्राण्यांची बिबट्यापासून सुरक्षा करणे हे आव्हान आहे. मात्र, आता तालुक्‍यामध्ये लांडग्यांनीही उच्छाद मांडला असून या हल्ल्यात 23 शेळ्या गतप्राण झाल्याने लांडग्यानीही डोकेदुखीत भर घातल्याचे स्पष्ट होत आहे. बिबट्यासह लांडग्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाकडे केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)