लहान हाती लागलेली मोबाईलची कीड

मोबाईलला चिटकून बसलेली आजची लहान मुलं पहिली की मन आपसूकच आपण जगलेल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रममाण होते. गाभुळलेल्या चिंचेचा आस्वाद, बॅटखाली पाडलेले नंबर, उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला गेल्यावर वर्षातून एकदाच भेटणारे सवंगडी अशा अनेक आठवणी डोळ्यासमोरून जाऊ लागतात आणि आपण स्मार्टफोन नसलेल्या पिढीमध्ये जन्मल्याने आपण किती भाग्यवान आहोत याची प्रचिती येते.

लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागायला कारणीभूत आहे ती म्हणजे आजची लाईफस्टाईल ! आजची लाईफ स्टाईलचं काही और आहे. मोकळ्या अंगणात आभाळाच्या छताखाली बसून आपल्या मुलांसोबत टाइम स्पेंड करायला पालकांकडे तरी कुठं ‘टाइम’ राहिलाय म्हणा! ऑफिसमधला पेंडिंग वर्क, पार्ट्या, आणि महिनाअखेरीस घर सुरळीत चालावं म्हणून आर्थिक गणितं जुळवता-जुळवता आजच्या पालकांचे मुलांसाठीच्या टाईमचे गणित मात्र नक्कीच बिघडले आहे. सतत स्वतःच्याच कामांमध्ये व्यस्त असलेले मम्मी पप्पा मग मुलाला गुंतवून ठेवण्यासाठी त्याच्या हाती ‘मोबाईल’ देतात आणि येथूनच सुरुवात होते लहानपणाला मोबाईलची कीड लागण्यास…!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हल्ली 8-9 वर्ष वय असणारी लहान मुलं देखील सर्रास मोबाईल वापरताना दिसतात. अशा मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्यास बऱ्याच वेळा ही मुलं हिंसक प्रतिक्रिया देतात. लहानपणाला मोबाईलचे व्यसन लागल्यानंतर विविध वयोगटातील लक्षण , वागणं वेगळं असत. त्यांचं वय, मानसिकता, विचार करण्याची पद्धत ह्या घटकांवरून त्यांचं मोबाईलशी असलेलं नातं समजतं. तीन वर्षापर्यंतच्या मुलांना फोटो, आवाज यांचं आकर्षण असत मात्र मोबाईलची सवय लागल्याने तीच चंचल असलेली मुलं मंदावतात. मोबाईलचा वापर वाढल्यामुळे झोपेचे आजार होतात. मोबाईलमध्ये असलेल्या फ्लिकरमुळे लाईटच प्रमाण हे कमी जास्त होत असतं यामुळे मेंदूमधील झोपेचे गणित बिघडायला सुरुवात होते आणि झोपेचे आजार डोकं वर काढायला लागतात. तीन ते सहा वर्षांच्या मुलांमध्ये हा त्रास मोठ्याप्रमाणात वाढतो आणि याचा परिणाम थेट शिक्षणावर तसेच सभोवतालच्या वातावरणावर होतो. शिक्षणाचा वेग मंदावणे, विचार क्षमता कमकुवत होणे आणि शेवटी मुलं एकलकोंडी होणे असे गंभीर परिणाम मोबाईलच्या व्यसनामुळे उद्वभवतात. पालकांनी मुलांना दिलेला वेळ हाच मुलांमधील मोबाइलचं अॅडिक्‍शन रोखण्यासाठीचा एकमेव पर्याय आहे. आपल्या मॉडर्न लाइफस्टाइलमुळं आपली मुलं एकटी पडणार नाहीत याकडे देखील लक्ष दिले पाहिजे.

– ऋषिकेश जंगम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)