लहान वयातच मुलांसाठी पीपीएफ खाते उघडणे फायदेशीर (भाग-२)

ज्यांना गुंतवणूक करताना जोखीम घ्यायची नाही, पण दीर्घकालीन गुंतवणूक करून मुलांसाठी मोठा निधी उभा करायचा आहे, त्यांना मुलांचे लहानपणी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) चे खाते काढण्यासारखा सुरक्षित गुंतवणुकीचा दुसरा मार्ग नाही.

लहान वयातच मुलांसाठी पीपीएफ खाते उघडणे फायदेशीर (भाग-१)

लहान वयातच अपत्याचे पीपीएफ खाते उघडले तर अपत्याला त्याचा कसा फायदा होतो ते पाहू. आधी नमूद केल्याप्रमाणे पीपीएफ खात्याचा लॉक इन पिरीयड 15 वर्षांचा असतो. एकदा का तुमचे अपत्य सज्ञान (अठरा वर्षे पूर्ण) झाले की, तो/ती खाते चालवू शकतात. तिची/त्याची स्वाक्षरी पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी लागते. जेव्हा तुम्ही लहान वयात मुलाचे पीपीएफ खाते काढता तेव्हा तो /ती वीस-पंचवीस वर्षाची होईपर्यंत लॉक इन पिरियडची 15 वर्षे पूर्ण होतात किंवा होत आलेली असतात. त्याचा फायदा असा की, 15 वर्षांच्या लॉक इन पिरियड ऐवजी सज्ञान झाल्यानंतर मुलांना पाच-दहा वर्षातच त्यातील पैसे काढून अकाउंट बंद करता येते किंवा पुढे चालू ठेवण्याचा अधिक चांगला निर्णय घेता येतो. या अकाउंटला ईईई दर्जा असल्याने अकाउंट बंद करून पैसे काढल्यास या रकमेवर कर आकारणी होत नाही. तसेच व्याजही करमुक्त असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीपीएफ हे गुंतवणुकीचे चांगले साधन मानले जाते. मात्र 15 वर्षाच्या लॉक इन पिरियडमुळे रोकड सुलभता ही मोठी अडचण ठरते. ही त्रुटी तुम्ही अपत्याचे पीपीएफ खाते लवकर काढले तर दूर होते.

मॅच्युरिटीनंतर खातेधारकासमोर दोन पर्याय असतात. पैसे काढून घेऊन खाते बंद करणे किंवा खात्याची मुदत दर पाच वर्षांनी वाढवत नेता येते. मुदत वाढवल्यानंतर भविष्यात नियमित पैसे भरत राहण्याचा किंवा न भरण्याचा आणि खाते चालू ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

म्हणजेच नोकरी-व्यवसायाला लागल्यानंतर पीपीएफ खाते मॅच्युअर झाल्यावर तुमच्या मुलाला/मुलीला वाटले की, तिच्यासमोर खाते पुढे चालू ठेवायचे की बंद करून पैसे काढून घ्यायचे असे दोन पर्याय असते. त्यावेळच्या गरजा, गुंतवणुकीचे नियोजन यानुसार ते निर्णय घेऊ शकतात. मात्र त्यांच्यासाठी गुंतवणुकीची भक्कम पायाभरणी आधीच झालेली असते. भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने आत्मविश्वास वाढवणारी ही घटना ठरते.

मॅच्युरिटीनंतरही खाते चालू ठेवायचे ठरवले तर सध्या खात्यात असलेल्या रकमेवर लागू असलेले व्याज मिळत जाते. पुन्हा या व्याजाची भर मुद्दलात पडते आणि पुढील वर्षी व्याजाच्या रकमेत वाढ होते. या चक्रवाढीचा फायदा दीर्घकाळत मोठा परतावा देऊन जातो. मुख्य म्हणजे हे व्याज पूर्णपणे करमुक्त आहे.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)