लहान मुलांच्या हाती मोबाइल नको, वाद्य द्या

पं. केशव गिंडे : पं. भीमसेन जोशी पुरस्काराने सन्मान

पुणे – “शालेय अभ्यासक्रमात संगीत विषयाला महत्त्व दिले जात नाही. त्यातून अनेक कलाकार घडतील, कला शिक्षणाने त्यांच्या जीवनाला आकार मिळेल. लहान मुलांच्या हातात मोबाइल देण्यापेक्षा एखादे वाद्य देणे गरजेचे आहे,’ अशी टिपण्णी करत “हा पुरस्कार मी गुरूजनांना अर्पण करतो. बासरी वाद्याच्या शिक्षण आणि संशोधनासाठी या पुरस्काराची रक्कम वापरणार आहे,’ अशी भावना ज्येष्ठ बासरीवादक पंडित केशव गिंडे यांनी येथे व्यक्‍त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पं. गिंडे यांना ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. नाथराव नेरळकर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खॉं, ज्येष्ठ गायिका शुभदा पराडकर, सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालक स्वाती काळे, आमदार मेधा कुलकर्णी, वीणा गिंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मिलिंद तुळाणकर यांचे जलतरंग वादन झाले. यावेळी पं. गिंडे यांच्या शिष्यांनी बासरीची कमान करून त्यांना अभिवादन दिले.

“वयाच्या सहाव्या वर्षी आईने दिलेली बासरी माझ्या जीवनाचा श्‍वास आणि ध्यास झाला. संगीत ही साधना असून त्यामध्ये अनेक भाव आणि बारकावे आहेत. माझ्या बासरीवादनाला देवाचा आशीर्वाद, राजाश्रय, लोकाश्रय मिळाला आणि आता सरकारचा पुरस्कार मिळाल्याने मी भारावून गेलो,’ अशा भावना पंडित गिंडे यांनी व्यक्त केल्या.

“आपल्याकडील साहित्याचा अनमोल ठेवा युवा पिढीपुढे आणण्यात राज्याच्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेतला आहे. अनेकदा पुरस्काराच्या नावामुळे योग्यता असूनही वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकारांना पुरस्कार मिळू शकत नाही. प्रभाकर पणशीकर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या नाट्यजीवनगौरव पुरस्काराप्रमाणे पं. भीमसेन जोशी यांच्या नावाचा पुरस्कार जसा गायकांना दिला जातो, तसा तो वादक कलाकारांनाही दिला पाहिजे,’ ही शासनाची भूमिका आहे, असे तावडे म्हणाले. यावेळी त्यांनी पंडित गिंडे यांच्या कार्यामध्ये खारीचा वाटा म्हणून मंत्रिपदाचे एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)