लहान मुलांची मानसिकता समजून घ्या

लहान मुलांची मानसिकता हा खूप गहन विषय आहे, हे खरे असले तरी पालकांना हा विषय टाळणे, म्हणजे लहान मुलांवर मानसिक आघात करणे, असेच असते.

पस्तीस वर्षांची रागिणी स्वत:हून भेटायला आली. भेटीसाठी आल्यावर तिने स्वत:ची जुजबी ओळख करून दिली. रागिणीचं सात-आठ वर्षांपूर्वी लग्न झालं. नंतर बऱ्याच प्रयत्नानंतर दोन-तीन वर्षांनी तिला मुलगी झाली. सुरुवातीला मुलीला पाळणाघरात ठेवून रागिणीने आपली आधीची नोकरी चालूच ठेवली होती.

परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून सासूबाई आजारपणामुळे अगदी अंथरुणालाच खिळल्यामुळे आणि घरात इतर कोणीच त्यांच्याकडे लक्ष देऊ शकणार नसल्यामुळे, सासरे आणि नवरा यांच्या सांगण्यावरून तिने नोकरी सोडली आणि आता तिचा संपूर्ण वेळ सासूबाईंची काळजी घेण्यात आणि मुलीला म्हणजेच आयेशाला सांभाळण्यात जातो. दिवस कसा येतो आणि कसा संपतो तिला समजतच नाही.

रागिणीचं सारं बोलणं झाल्यावर तिला भेटायला येण्यामागील कारण विचारलं. हा विषय निघताच तिला रडू आलं. तिने थोडा वेळ मागितला आणि शांत झाल्यावर तिने तिची समस्या सांगितली. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून तिची सहा वर्षांची मुलगी, आयेशा तिच्याशी नीट बोलत नाही. सारखी आईचा रागराग करते, जवळ गेलं की, “तू आवडत नाहीस मला,’ असं म्हणून आजी-आजोबांकडे निघून जाते. संध्याकाळी बाबा कामावरून आले की, “आई मला मारते, शिक्षा करते..’ अशा तक्रारी करते आणि बाबांना आईला रागवायला सांगते.

इथपर्यंत ठीक आहे. पण महिन्याभरापूर्वी आयेशाने अभ्यास केला नाही म्हणून रागिणी तिला रागावली. तर आयेशा रागाने म्हणाली, “जा मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. तू वेडी आहेस. मला फक्‍त बाबा, आजी, आजोबाच आवडतात. ते मला कधीच रागवत नाहीत. तूच मला सारखी मारतेस आणि रागावतेस, मला नाही बोलायचं तुझ्याशी. तू माझा अभ्यास पण नको घेऊस. माझ्याशी खेळूपण नकोस आणि माझ्या शेजारी झोपू पण नकोस. मी फक्त बाबांजवळच झोपणार.’

सुरुवातीला रागिणीला असं वाटलं की, आयेशा चिडली म्हणून असं बोलली असेल. नंतर होईल शांत. पण आयेशा खरंच आईशी बोलेनाशी झाली. आईशेजारी झोपेनाशी झाली. आईजवळ आली की ती आजी-आजोबांच्या खोलीत निघून जायची. हे सारं रागिणीच्या मनाला खूप लागतं होतं. आपण कुठे चुकतोय? कुठे कमी पडतोय? मुलांना रागवायचंच नाही का? आयेशाला खरंच माझी किंमत राहिली नाही का? तिच्या एवढ्या लहान वयातच आमचं नातं असं दुराव्याचं होणार का? असे एक ना अनेक प्रश्‍न रागिणीला पडले होते.

तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. आपण आयेशाला वाढवण्यात कमी पडलो, हा अपराधी भाव तिला स्वस्थ बसू देत नव्हता. पण विचार केला तर या साऱ्या माहितीतून एक वेगळीच समस्या लक्षात आली आणि त्यासाठी रागिणी बरोबरच इतर कुटुंबीयांनीही प्रयत्न करणं आवश्‍यक होतं. ती समस्या अशी की, आयेशाला वाढवणारे घरातल्या घरातच दोन गट तयार झाले होते. एक गट बाबा, आजी, आजोबा यांचा आणि दुसरा एकट्या आईचा.

एका गटात तिच्या म्हणण्याचा मान राखला जायाचा, तिचं फक्‍त कौतुकच केलं जायचं आणि आई रागवली की, नको इतकी माया, प्रेम, सहानुभूती मिळायची. दुसऱ्या गटात चूक झाल्यावर बोलणी, फटका, शिक्षा आणि कधीतरी शाब्बासकी. पण आयेशाच्या वयाचा विचार केला तर तिला बाबा, आजी, आजोबांचा गटच आवडणार. कारण तिथे शिस्त, शिक्षा नव्हतीच मुळी. त्यामुळेच तिला आई आवडतं नव्हती. कारण दोन्ही गटात तिला मिळणारी वागणूक दोन विरुद्ध टोकांची होती.

ही समस्या लक्षात आल्यावर रागिणीला तिच्या नवऱ्याला घेऊन भेटायला बोलावलं. ठरल्याप्रमाणे दोघेजण भेटायला आले. या भेटीदरम्यान त्या दोघांनाही आयेशाची वरील लक्षात आलेली नक्की समस्या, त्या मागील कारणे, त्याचे सध्याचे तसेच भविष्यकाळातील होऊ शकणारे परिणाम आणि त्यासाठी आवश्‍यक किंवा उपयुक्‍त उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. काही बदल आईला तर काही बदल वडिलांना सुचवले. आजी-आजोबा वयानुसार या बदलांना विरोध करतील हा अंदाज लक्षात घेऊन त्यांनाही हळूहळू या साऱ्यात कसे सामावून घेता येईल, यावरही चर्चा केली.

अपेक्षेप्रमाणे सुरुवातीला आजी-आजोबांनी बदलांना विरोध केलाच. पण हळूहळू फरक लक्षात यायला लागल्यावर त्याचा विरोध मावळला आणि आयेशाला वाढवणाऱ्या दोन गटांची समेट घडून आली आणि आयेशाची समस्या आपोआपच सुटली. अशी भूमिका सर्वच पालकांनी ठेवणे गरजेचे आहे, असे सुचवावेसे वाटते.
(केसमधील नावे बदलली आहेत)

मानसी चांदोरीकर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)