लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली – लष्करातील सर्व विभाग आणि देशभरातील तळांवर नेमून दिलेल्या शिस्तपालन उपाय योजनांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात देशभरातील 12 लाख लष्करी जवानांशी लष्कर प्रमुखांनी संवाद साधला. त्यावेळी शिस्तभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत.

सुरक्षा दलांनी आपल्या उपलब्ध अर्थिक स्रोतांचा न्याय्य मार्गाने उपयोग व्हायलाच पाहिजे. तसेच सुरक्षा दलांना मिलीटरी कॅन्टीनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या किराणा सामान आणि मद्यसुविधेचा गैरवापर केला जाऊ नये. भ्रष्टाचार आणि नैतिक तापटपणाशी संबंधित प्रकरणांची कठोरपणे दखल घ्यायला हवी. अधिकाऱ्यांनी पदोन्नती आणि बढतीसाठी केवळ चकचकीतपणावर विसंबून रहायला नको. जे बढती आणि पदोन्नतीस पात्र आहेत त्यांना योग्य मोबदला मिळेल, अशी हमी देखील लष्कर प्रमुखांनी दिली आहे. पात्र लष्करी अधिकाऱ्यांशिवाय कोणाही निवृत्त अधिकाऱ्यासह सहायक सेवा दिली जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

लष्करातील 12 लाख जवानांच्या शारीरिक सुदृढतेवर लष्कर प्रमुखांनी विशेष भर दिला. जवानांनी आरोग्यास अपायकारक अन्नाचे सेवन करू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. शिस्तीचे हे निकष गेल्या काही दशकांपासून अस्तित्वात आहे. लष्कर प्रमुख जन. रावत यांनी या निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)