लवकरच कोळगाव उपबाजार समिती होणार

संग्रहित छायाचित्र

श्रीगोंदा – श्रीगोंदा बाजार समिती संलग्न कोळगाव येथे उपबाजार स्थापन करण्यासाठी बाळासाहेब नलगे यांच्या प्रयत्नातून त्यांची भगिनी पुष्पा किशोर लांगोरे यांनी त्यांच्या नावावरील 35 लाख रुपये किमतीची 2 एकर जमीन श्रीगोंदा बाजार समितीला देण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार बक्षीसपत्र करून दिली. त्यामुळे श्रीगोंदा बाजार समितीचा उपबाजार कोळगाव स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावेळी बोलताना उपसभापती वैभव पाचपुते म्हणाले की, कोळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात भुसार व लिंबू शेतीमाल उत्पादन होत आहे. परंतु, त्यांना जवळची बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी नगर किंवा श्रीगोंदा येथे 40 किलोमीटरपर्यंत जावे लागत आहे. या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कोळगाव येथे जागा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु, जागेच्या किमती जास्त असल्यामुळे बाजार समितीस जागा खरेदी करणे शक्‍य होत नव्हते. त्यावेळी बाळासाहेब नलगे यांच्या रूपाने बाजार समितीस दाता मिळाला. त्यांनी कोणतीही अट न ठेवता बाजार समितीस मोफत जागा दिली. त्यामुळे बाजार समितीने बाळासाहेब नलगे व बाजार समितीचे सभापती धनसिंगराव भोयटे यांचे आजोबा सुभेदार नारायणराव नलगे यांचे नाव उपबाजार कोळगाव आवारास देण्याचे मान्य केले. जागा मिळण्यासाठी बाजार समितीचे रोखापाल संपतराव शिर्के यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी बोलताना बाजार समितीचे संचालक संजय जामदार म्हणाले, “”बाजार समितीची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे आजपर्यंत कोळगाव येथे उपबाजार स्थापन करण्याचे शक्‍य झाले नाही. परंतु, बाळासाहेब नलगे यांच्या दिलदारपणामुळे ते शक्‍य झाले आहे.

संचालक सतीश पोखर्णा म्हणाले, “”कोळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जागेची सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भुसार व लिंबू शेतीमाल खरेदीसाठी 5 ते 10 आडते व खरेदीदार यांच्या माध्यमातून खरेदी-विक्री व्यवहार सुरू करण्यात येऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मण (अण्णा) नलगे, भाऊसाहेब कोथिंबिरे, बाजार समितीचे अधिकारी उपस्थित होते. आभार बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)