ललित कलांविषयी पुलंच्या मनात होती तळमळ

पुलोत्सवांतर्गत “व्यंग्यचित्रांची दुनिया’ परिसंवादात मान्यवरांचे मत

पुणे – नाटक, वक्तृत्व, संगीत आदी कलांमध्ये पारंगत असणाऱ्या पु. ल. देशपांडेंना व्यंगचित्रे काढण्याचा छंद होता. मात्र, आपल्याला व्यंगचित्रकार होता आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. तरी एकूणच समांतर ललित कलांच्या विकासाविषयी पुलंच्या मनात तळमळ होती, अशी भावना पुलोत्सवांतर्गत आयोजित “व्यंग्यचित्रांची दुनिया’ या विषयावरील परिसंवादात व्यक्त केली. यामध्ये शि. द. फडणीस, प्रशांत कुलकर्णी आणि आलोक निरंतर सहभागी होते.

आपल्या शब्दांना व्यंग्यचित्रांची जोड मिळावी, असा पुलंचा नेहमीच आग्रह असायचा. त्यांच्या शब्दांना रेषांव्दारे व्यक्त करण्याची संधी मला आणि वसंत सरवटे यांना मिळाली, यामुळे आम्ही स्वतःला नशीबवान समजतो. ललित कलांमध्ये रमणाऱ्या पुलंनी विद्यार्थी दशेत व्यंगचित्रेही रेखाटली. व्यंगचित्रासारख्या कलांना भाषेचा अडसर येत नाही, या कला आशयाने ओतप्रोत भरलेल्या असतात, असे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस म्हणाले.

लहानपणी पुलंच्या कॅसेट घरी ऐकल्या होत्या, आता त्या मागे पडल्या. मी पुलंच्या व्यक्तीरेखा व्यंगचित्रांच्या माध्यमातून रेखाटल्या आहेत. त्यांचे साहित्य आजही चिरतरूण वाटते. कलावंताची अजोड प्रतिभा अनेक पिढ्या संपन्न करीत आहे, असे आलोक निरंतर म्हणाले. व्यंग्यचित्रकला गांभिर्याने आस्वाद घेण्याची आहे. ही कला म्हणजे कलांची राणी असून त्यातून योग्य तो संदेशही पोहोचवता येतो. माझे गुरू आणि मार्गदर्शक वसंत सरवटे यांची हजारो चित्रे मी पाहत होतो. पुलं एक साठवण या पुस्तकाचे समर्पक मुखपृष्ठ वसंत सरवटे यांनी रेखाटले. त्यांची सर्जनशीलता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे, असे मत प्रशांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

परिसंवादापूर्वी बालगंधर्व कलादालनात “पुलंकित रेषा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन फडणीस यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 30 व्यंगचित्रकारांनी उलगडलेले पुलं आणि पुलंच्या लेखनातील पात्रे रसिकांना 25 तारखेपर्यंत विनामूल्य पाहता येतील. परिसंवादाचे सूत्रसंचालन चारूहास पंडित यांनी केले. यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांनी उपस्थितांच्या आग्रहास्तव व्यंग्यचित्र रेखाटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)